नवी दिल्ली : कोरोनामुळे वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्यासाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चिंता भारताचा आघाडीचा मल्ल बजरंग पुनिया याने शुक्रवारी व्यक्त केली.‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या माझ्यासारख्या मल्लांपुढे पदक जिंकणे हेच लक्ष्य असल्याने त्यादृष्टीने सरावाकडे वळलो आहे. दुसरीकडे ज्यांनी अद्याप पात्रता गाठलेली नाही, त्यांचे काय? सध्या स्पर्धा आयोजन नसल्यामुळे माझी कामगिरी किती सुधारली याचा वेध घेणे देखील कठीण आहे,’या शब्दात ६५ किलो गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंगने चिंता व्यक्त केली. एका वेबिनारमध्ये बोलताना कुस्तीत आॅलिम्पिक पदकाचे आशास्थान असलेला बजरंग पुढे म्हणाला, ‘आम्ही सर्वजण लॉकडाऊनमध्ये असलो तरी मी दररोज सराव करत आहे. माझ्या सभोवताल चांगले लोक आहेत.’बजरंगसह दीपक पुनिया (८६ किलो), रवी दहिया (५७ किलो) आणि विनेश फोगाट (महिला ५३ किलो) यांनी टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. कार्यक्रमात सहभागी झालेली विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेती पूजा ढांढा म्हणाली,‘स्पर्धा कुठलीही असली तरी खरी परीक्षा त्या दीड महिन्याच्या कालावधीत असते. शरीर त्यानुसार प्रतिक्रिया देते. कोरोनामुळे स्पर्धांचे आयोजन होऊ न शकणे आमच्यासाठी कठीण ठरत आहे.’ एक सप्टेंबरपासून सुरू होणाºया राष्टÑीय शिबिरात (पुरुषांसाठी सोनिपत आणि महिलांसाठी लखनौ) ही उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न असेल, असे दोन्ही मल्लांनी सांगितले.(वृत्तसंस्था)
ऑलिम्पिकसाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 1:11 AM