राष्ट्रीय स्क्वॉश : महाराष्ट्राच्या चिरागचीही चमक
मुंबई : दिल्लीच्या गौरव नंदराजोग याने तुफानी खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या श्रेयश मेहताचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवून ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्कॉश अजिंक्यपद स्पर्धा पात्रता फेरीत दिमाखात आगेकूच केली. त्याचवेळी महाराष्ट्राच्या चिराग खेमानी याने आपल्याच राज्याच्या अंकित वाढवाचा पराभव करुन विजयी कूच केली.मुंबईतील ओट्टर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत २००६ साली उपविजेता ठरलेल्या गौरवने एकतर्फी झालेल्या सामन्यात श्रेयशला कोणतीही संधी न देता ११-२, ११-२, ११-२ असे लोळवले. या शानदार विजयासह त्याने पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मुंबईचा उद्योन्मुख ज्युनिअर खेळाडू असलेल्या श्रेयशचा अनुभवी गौरवच्या आक्रमकतेपुढे काहीच निभाव लागला नाही.दुसरीकडे, चिरागने आपल्याच राज्याच्या अंकितचा १२-१०, ११-३, ११-३ असा धुव्वा उडवून चमकदार विजयाची नोंद केली. पहिल्या सेटमध्ये अंकितकडून थोडाफार प्रतिकार मिळाल्यानंतर चिरागने जबरदस्त हल्ला करताना अंकितला प्रचंड दबावाखाली ठेवले. उत्तर प्रदेशच्या रजत शर्मानेही सलग तीन सेटमध्ये बाजी मारताना जम्मू-काश्मिरच्या आसिफ बाशिर ठोकरचा ११-३, ११-३, ११-१ अस धुव्वा उडवला.तर, चार सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात चंदीगडच्या हितेश्वर सिंग रायर याने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना तेलंगणाच्या आश्रय ओहरीला ११-७, ४-११, ११-९, ११-४ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)