विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली, तरी चांगला निकाल ठरेल, असे म्हटले होते. एकूण कामगिरीचा विचार करता भारतासाठी ही स्पर्धा चांगली राहिली. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण दर्जेदार असलेल्या संघाविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला. चांगल्या संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागणे लाजीरवाणी बाब नाही. आॅस्ट्रेलियाने सरस असल्याचे सिद्ध केले. आता चांगल्या मोहिमेची प्रशंसा करण्याची वेळ आहे. भारताकडे संधी होत्या, पण मोजक्याच. डेव्हिड वॉर्नर लवकरच माघारी परतला त्या वेळी भारताकडे संधी होती, पण स्टीव्हन स्मिथने विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी केल्यामुळे ही संधी हिसकावल्या गेली. स्मिथने केवळ संघासाठी धावाच फटकावल्या नाही, तर त्याने फिंचच्या साथीने धावगतीला वेग दिला. स्मिथ युवा क्रिकेटपटू असून, भारताविरुद्ध त्याची कामगिरी विशेष बहरते. स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकीपटू आर. अश्विनने भारताला पुन्हा वर्चस्व मिळवून देण्याची संधी प्रदान केली, पण आॅस्ट्रेलिया संघाच्या खोलवर फलंदाजीमध्ये एक ना एक खेळाडू संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात यशस्वी ठरू शकत होता. आॅस्ट्रेलियाने ३२८ धावांची मजल मारल्यानंतर सामन्याचा निकाल बऱ्याच अंशी निश्चित झाला होता. अचूक मारा करण्याची क्षमता असलेले गोलंदाज आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण असलेल्या संघाविरुद्ध ही धावसंख्या ३६० असल्याप्रमाणे होती. त्यामुळे भारतातर्फे रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांच्यापैकी एकाने मोठी खेळी करणे आवश्यक होते. पण, हा अडथळा दूर करण्याची जबाबदारी मिशेल जॉन्सनने स्वीकारली. त्याला आतापर्यंत स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण संघाला गरज असताना त्याने शानदार कामगिरी केली. महान गोलंदाजाचे हे वैशिष्ट्य असते. रोहित व कोहली तंबूत परतल्यानंतर सामना संपलेला होता. धोनीची खेळी काही अंशी रहस्यमय होती, पण त्याने पत्रकार परिषदेत कबूल केले, की तळाच्या फलंदाजांसह लक्ष्य गाठणे शक्य नाही, याची कल्पना आली होती. भारतासाठी ही विश्वकप स्पर्धा येथेच संपली आहे. एक निराशाजनक लढत, पण एक चांगली मोहीम. भारतीय संघाला एका दिग्गज संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला, ही नक्कीच लाजीरवाणी बाब नाही. (टीसीएम)
शानदार मोहिमेचा निराशाजनक शेवट
By admin | Published: March 27, 2015 1:54 AM