टोकियो : मंगळवारपासून सुरू झालेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात भारतीयांसाठी निराशाजनक झाली. तरुण कोना - एन. सिक्की रेड्डी या अनुभवी जोडीला स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील पहिल्याच फेरीमध्ये पराभव पत्करावा लागल्याने गाशा गुंडाळावा लागला. त्याच वेळी पुरुष एकेरीमध्ये आनंद पवारचे आव्हानसुद्धा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.मिश्र दुहेरीतील पहिल्या क्वालिफाइंग सामन्यात रेड्डी - कोना जोडीला जपानच्या यूता वातानाबे - अरिंसा हिगाशिनो विरुद्ध ४४ मिनिटांंमध्ये पराभूत व्हावे लागले. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात पहिला सेट गमावून पिछाडीवर पडलेल्या भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करताना सामना अंतिम सेटमध्ये नेला. मात्र, अंतिम क्षणी केलेल्या चुकांचा फटका बसल्याने अखेर रेड्डी - कोना जोडीला ९-२१, २१-१३, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.त्याच वेळी पुरुष एकेरीमध्ये ५० मिनिटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या क्वालिफाइंग सामन्यात आनंदला जपानच्याच कांता सूनेयामा विरुद्ध २०-२२, १८-२१ असे धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागले. जागतिक क्रमवारीत ५१व्या क्रमांकावर असलेल्या आनंदचा २७८व्या क्रमांकावरील कांता विरुद्धचा विजय गृहीत धरला जात होता. मात्र, कांताने अनपेक्षित कामगिरी करताना स्पर्धेत खळबळ माजवली. (वृत्तसंस्था)
भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात
By admin | Published: September 09, 2015 2:28 AM