रिओ : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या पूजाला प्राथमिक फेरीत ५१३ गुणांसह २९व्या स्थानांवर समाधान मानावे लागले. पूजाने आपल्या पहिल्या सहा संधीमध्ये ९, ८, ८, ८, ७ आणि ९ अशा गुणांचा वेध घेत एकूण ४७ गुण मिळवले. यानंतर मात्र तिने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करताना १०, ९, ८, ८, ८ आणि ७ अशी कामगिरी करीत एकूण ५० गुण मिळवले, तर तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये पूजाची कामगिरी खालावली. यावेळी तिला अनुक्रमे ४३ व ४५ गुणांवरच समाधान मानावे लागले. यानंतर पूजाच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा दडपणाखाली आल्याने पाचव्या व सहाव्या फेरीमध्ये अनुक्रमे ४१ आणि ४४ गुणांसह एकूण ५१३ गुणांसह तिला २९व्या स्थानी समाधान मानावे लागले. दुसरीकडे, नेमबाजीमध्येही भारतीयांसाठी निराशाजनक कामगिरी झाली. भारताच्या नरेश कुमारला १० मीटर एअर रायफल प्रोन प्रकारामध्ये ४४ व्या स्थानी समाधान मानावे लागल्याने पात्रता फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेत नरेशने ६०६.५ गुणांचा वेध घेतला. यावेळी ४४ व्या स्थानी राहिल्याने अंतिम फेरीतील प्रवेशापासून तो मुकला. चार फेरींमध्ये त्याने अनुक्रमे १००.६, १०१.९, ९८.६ आणि १०१.४ अशा गुणांचा वेध घेतला. त्याचवेळी स्लोवाकियाच्या वेरोनिका वाडोविकोवा याने सर्वाधिक ६३६.७ गुणांसह अग्रस्थान मिळवले.
विशेष म्हणजे, याआधी नरेशचे १० मीटर एअर रायफल स्टॅँडिंग एसएच १ प्रकारातही आव्हान संपुष्टात आले होते. यामध्ये पात्रता फेरीत अत्यंत खराब प्रदर्शनासह तो तळाला राहिला. एकूण चार सीरिजमध्ये नरेशने एकूण ५८३ गुणांचा वेध घेतला होता. (वृत्तसंस्था)