सचिन कोरडे
जयपूर, दि. 2 - सरकारच्या उदासीन धोरणामुळे गणवेशाविनाच मैदानात उतरलेल्या गोव्याच्या पॅरालिम्पिक खेळाडूंनी जयपूर येथे शानदार प्रदर्शन केले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १४ वर्षीय पुष्पा चौधरी हिने लांब उडीतगोव्याला सुवर्णपदक मिळवून दिले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिच्या गटात पुष्पाने ४.११ मीटर अशी लांब उडी घेत सुवर्णमय कामगिरी नोंदवली. स्पर्धेतील गोव्याचे हे पहिले पदक ठरले. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर १७वी राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील जवळपास २ हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेत गोव्याच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. त्यात मंगेश कुट्टीकर (जलतरण), विवेक शिराली (जलतरण), नीरज सिंग (गोळाफेक, भालाफेक), पुष्पा चौधरी (लांब उडी, गोळाफेक) आणि सुनील कुमार (गोळाफेक) यांचा समावेश आहे. ५० मीटर फ्रिस्टाईल जलतरणात मंगेश कुट्टीकरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सोमवारी (दि.३) नीरज कुमार आणि सुनील कुमार हे थाळीफेक स्पर्धेत सहभागी होतील. दरम्यान, गोव्याच्या या खेळाडूंना गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून प्रवास खर्च आणि किट्सही मिळालेले नाही. याची खंत खेळाडूंनी ह्यलोकमतह्णकडे खंत व्यक्त केली होती. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अशा प्रकारे सहभागी होणे दु:खदायक असल्याचे भासत असले तरी त्याचा कामगिरीवर परिणाम होऊ देणार नाही, असे ६५ वर्षीय जलतरणपटू विवेक शिराली यांनी सांगितले.