पॅरीस : जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला पॅरीस मास्टर्स उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मारिन सिलीचकडून पराभव स्वीकारावा लागला, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडी मरे याने उपांत्यपूर्व फेरीतील आपल्या सामन्यात विजय मिळवला आहे. जोकोविचच्या पराभवानंतर मरेला पहिले स्थान पटकावण्याची संधी आहे.गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या जोकोविचला सिलीच याने करियरमध्ये पहिल्यादाच पराभूत केले. सिलीचने कडव्या संघर्षानंतर जोकोला ६-४,७-६ असे पराभूत केले. तर मरे याने चेक गणराज्याच्या टॉमस बेर्डिच याला दोन तास चाललेल्या सामन्यात ७-६,७-५ असे पराभूत करत उपांत्य फेरीत जागा मिळवली. जोकोविचच्या पराभवानंतर मरेला नंबर वन बनणण्याची संधी आहे. मरेने उपांत्य फेरीत विजय मिळवला, तर तो पहिल्यांदा नंबर वन रँकिग मिळवेल. १२२ आठवड्यांनंतर जोकोविचचे अव्वल स्थान गमावण्याची शक्यता आहे. मरेची उपांत्य फेरीतील लढत कॅनडाच्या मिलोस राओनिक आणि फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगा यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत होणार आहे. सामन्यानंतर मरे म्हणाला की, ‘ उपांत्य फेरीतील सामन्यापूर्वी थोडा नर्व्हस होतो. मला माहीत होते की, हा सामनादेखील अन्य सामन्यांप्रमाणेच आहे. आणि मी जर स्वत:वर नियंत्रण राखू शकलो तर निश्चीतपणे पुढे जाऊ शकेल. माझ्याकडे अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.’ (वृत्तसंस्था)
जोकोविचला पराभवाचा धक्का
By admin | Published: November 06, 2016 2:33 AM