मेलबर्न : आगामी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या मुख्य यादीत सर्बियाचा जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोवाक जोकोविच याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जोकोविच या स्पर्धेत खेळणार आहे की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जोकोविचला अद्यापही ऑस्ट्रेलियन सरकारने व्हिसा दिलेला नाही.
कोरोना लसीकरण पूर्ण न केल्याने जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने व्हिसा नाकारला. त्यानंतर न्यायालयीन लढाई जिंकत जोकोने व्हिसा मिळविला असला, तरी त्याला अद्याप ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. या वादविवादानंतरही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी जोकोविचला मुख्य फेरीच्या ड्रॉमध्ये स्थान दिले आहे. त्यानुसार जोकोविचला सलामीला जागतिक क्रमवारीत ७८व्या स्थानी असलेल्या सर्बियाच्याच मियोमीर केसमानोविचविरुद्ध खेळायचे आहे.
कोरोना लसीकरण नियमांतून वैद्यकीय सूट मिळण्यासाठी आवश्यक नियमांची पूर्तता करण्यात जोकोविच अपयशी ठरला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात मेलबोर्नला पोहोचल्यानंतर जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन न्यायालयात धाव घेतलेल्या जोकोविचने व्हिसा मिळविला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वैयक्तिक अधिकाराचा वापर करत इमिग्रेशन मंत्री ॲलेक्स हॉके जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा विचार करत आहेत.
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बर्नाबी जॉयस यांनीही याप्रकरणी जोकोविचला चुकीचे धरले आहे. ते म्हणाले की, ‘जोकोविचने देशाच्या कठोर कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केले आहे. आमच्यापैकी अनेकांच्या मते चूक जोकोविचची आहे. त्याने कोरोनाची दोन्ही लस न घेतल्याने त्याला देशाबाहेर करण्यात आले पाहिजे.’