ऑस्ट्रेलियन प्रशासनाने जोकोविचचा व्हिसा रद्द करून त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये ठेवताच जगभरातून असंख्य चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला. त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले होते. ‘जगभरातून तुम्ही मला दर्शवित असलेल्या पाठिंब्याबद्दल खूप आभार. मला पाठबळ जाणवत असून, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे,’ असे जोकोविचच म्हणाला होता.
नेमके काय घडले?
लसीकरणातून वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला. मात्र, आठ तासांहून अधिक वेळ त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले. कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. त्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले.
जोकोविचने याविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या फेडरल आणि कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याचा व्हिसा पुनरावलोकन आणि परत पाठवणीचा निर्णय सोमवापर्यंत प्रलंबित ठेवला होता. जोकोविचच्या परत पाठवणीला आव्हान देण्यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सुपूर्द केली. टेनिस ऑस्ट्रेलिया संघटनेने त्याला १ जानेवारीला लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्याचे प्रमाणपत्र दिले. काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरा झाल्याने ही सवलत मिळाल्याचा त्यात उल्लेख असल्याचा दावा वकिलांनी केला होता.
१६ डिसेंबर २०२१ रोजी जोकोविचच्या कोरोना चाचणीचा अहवालआधी पॉझिटिव्ह आला होता. मागील ७२ तासांत ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाहीत, असे वैद्यकीय सवलतीच्या प्रमाणपत्रात म्हटले होते.ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या खटल्याच्या तयारीसाठी न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. मात्र, गृहमंत्र्यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जोकोविच २० ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी असून, ऑस्ट्रेलियन ओपन त्याने नऊ वेळा जिंकले. यंदा येथे विजेता बनल्यास तो रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यापुढे जाऊ शकेल.