पॅरिस : सर्बियाचा जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सोमवारी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सलग दहाव्यांदा पोहोचण्याचा विक्रम केला. दुसरीकडे जपानच्या केई निशिकोरी याला क्ले कोर्टवरील सर्वात मोठे आव्हान म्हणून पाहिले जाणाऱ्या राफेल नदाल याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.
जोकोविचने जर्मनीच्या जान-लेनार्ड स्ट्रफ याचा पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला. या विजयाबरोबरच जोकोविचने दुसऱ्यांदा सलग सर्व चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
सर्बियाच्या या ३२ वर्षीय खेळाडूची लढत नवव्या मानांकित इटलीच्या फॅबियो फोगनिनी आणि पाचव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यातील विजयी खेळाडूविरुद्ध होईल. जोकोविच म्हणाला, ‘पावसामुळे थोठे कोठीण होते; परंतु हे पॅरिस आहे. मला माझ्या सर्व्हिसवर विश्वास आहे आणि पुढेही ते कायम सुरू ठेवण्याची आशा आहे.’ जोकोविच (२०१६) याच्याआधी फक्त आॅस्ट्रेलियाचा दिग्गज रॉड लेव्हर यांनी सलग चार ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्यांनी ही कामगिरी १९६२ आणि १९६९ मध्ये केली.
दुसरीकडे, जपानच्या सातव्या मानांकित निशीकोरीने १-४ आणि ३-५ अशा पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना फ्रान्सच्या बेनोईट पियरे याचा जवळपास ४ तास रंगलेल्या लढतीत ६-२, ६-७, ६-२, ६-७, ७-५ असा पराभव केला. सलग तिसºयांदा या स्पर्धेत निशिकोरीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र आता या मॅरेथॉन लढतीनंतर त्याला उपांत्य फेरी गाठण्यासाठी राफेल नदालचे तगडे आव्हान मोडीत काढावे लागेल.
अमेरिकेच्या १४ व्या मानांकित मेडिसन कीज हिने कॅटरिना सिनिकोव्हा हिचा ६-२, ६-४ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिनिकोव्हा हिने याआधी यूएस व ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या नाओमी ओसाका हिला पराभूत केले होते. २०१८ मध्ये या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाºया कीजची पुढील फेरीत ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित अॅश्ले बार्टी हिच्याशी गाठ पडेल. बार्टी हिने अन्य एका लढतीत सोफिया केनिन हिचा ६-३, ३-६, ६-० असा पराभव केला.