- किशोर बागडे (थेट गुवाहाटी येथून...)थोडे यश मिळाले तरी महान खेळाडू बनल्याचा आवेग भारतीय खेळाडूंमध्ये संचारतो. डोक्यात लवकर ‘हवा’ गेल्यास मिळालेले यश मातीमोल तर होतेच पण पुढील वाटचालही मंदावते. अनेक खेळाडूंचे करिअर असेच संपुष्टात आले. अजून बराच टप्पा गाठायचा आहे, हे डोक्यात ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केंद्र शासनाद्वारे नियुक्त राष्टÑीय पर्यवेक्षक आणि अनुभवी आॅलिम्पियन बॉक्सर अखिल कुमार याने केले आहे. विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी पत्नी पूनम आणि साडेसहा वर्षांच्या कन्येसह येथे आलेला अखिल बॉक्सिंगमधील युवा टॅलेंटबद्दल बोलला. युवा खेळाडूंना स्वत:चे टॅलेंट टिकविण्याचे त्याने आवाहन केले. खेळासोबतच नवनव्या गोष्टी आत्मसात करा आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. नव्या दमाच्या खेळाडूंनी थोड्याशा यशात हूरळून जावू नये. जो स्वत:ला मोठा खेळाडू समजतो, तो संपतो, हे अनेक खेळाडूंच्या वाटचालीवरून सिद्ध झाल्याचे अखिलचे मत होते. खेळाडू कितीही मोठा झाला तरी त्याचा मूळ स्वभाव बदलू नये.’ स्वभावाने मितभाषी असलेले खेळाडू प्रत्यक्ष खेळातही प्रभावी ठरू शकतात. त्यांच्यात जिंकण्याची भूक आहे. पण यशाची हवा डोक्यात शिरायला नको. वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम व्हायचा ध्यास खेळाडूंनी सतत बाळगला पाहिजे. खेळात प्रगती साधण्यासाठी फिजिओ, कोच आणि डॉक्टर यांचा सल्ला तंतोतंत अंमलात आणणे गरजेचे आहे. आपणच सर्वशक्तीमान असल्याची भावना मनात आणू नका. जे चांगले ते आत्मसात करा, असे अखिलने बॉक्सर्सना उद्देशून सांगितले. शिक्षणाचे खेळाडूंच्या जीवनात किती महत्त्व असते, हे पटवून देत अखिलने खेळाडूंना भााषेचा अडसर येत असेल तर कधीकधी ‘ध चा मा’ व्हायला वेळ लागत नसल्याचे सांगितले. विदेशी खेळाडू आणि कोच यांंचे डावपेच समजून घेण्यासाठी देखील शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास आणि संमजसपणा वाढीस लागतो. स्वत:च्या कन्येला बॉक्सिंगमध्ये आणणार नाही, असेस्पष्ट करीत ३६ वर्षांचा अखिल म्हणाला, ‘बॉक्सिंग आवडत असेल तर मी तिला ग्लोज घालायला मनाई करणार नाही, पण खेळासोबत शिक्षण महत्त्वपूर्ण आहे.बॉलिवूडशी परिचित असलेल्या अखिलने ‘लेकर हम दिवाना दिल’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. सध्याच्या खेळाडूंमधील पदकविजेत्या खेळाडूंवर सरकार बारकाईने लक्ष ठेवणार असून आगामी एशियाडसाठी त्यांच्या पदकाच्या आशा शोधण्याचे काम करणार असल्याचे अखिलने सांगितले.
गर्विष्ठ बनू नका, खेळावर ‘फोकस’ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 3:19 AM