- सौरव गांगुली लिहितो़...
एका दिग्गज खेळाडूची शानदार कामगिरी आहे ही. रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीच्या खेळीचे अशा शब्दात वर्णन करता येईल. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशीच भारतीय संघाची कामगिरी झाली. त्यापेक्षा विराटने दडपणाखाली केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. महान खेळाडू किंवा चॅम्पियन्सची ओळख अशा परिस्थितीमध्ये निर्माण होते. अन्य खेळाडूंच्या तुलनेत आपण का वेगळे आहोत, हे विराटने पुन्हा सिद्ध केले. टी-२० क्रिकेटमध्ये अपरंपरागत फटक्यांबाबत सर्वत्र चर्चा होत असली तरी विराटने परंपरागत फटके खेळूनही यश मिळविता येत असल्याचे सिद्ध केले. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचा दर्जा उच्च पातळीवर नेला आहे. मी त्याच्याबाबत यापेक्षा अधिक लिहिणार नाही. कारण भारतीयांचा एका हिंदी म्हणीवर विश्वास आहे. ‘नजर ना लग जाये’. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली असून अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास वाटतो. भारतीयांना या दोन्ही लढतींमध्ये विराटकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. पहिल्या पाच षटकांतील कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंनी सामन्याचे चित्र पालटले, त्यासाठी टीम इंडिया प्रशंसेस पात्र आहे. आॅस्ट्रेलिया संघ दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावांची मजल मारेल, असे वाटत होते, पण मधल्या षटकांमध्ये भारतीय फिरकीपटूंनी अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियाचा डाव माफक धावसंख्येत रोखण्यात यश मिळवले. युवराज सिंगच्या गोलंदाजी स्पेलला त्याचे के्रडिट मिळायलाच पाहिजे. पुनरागमन करताना विश्व चॅम्पियनशिपमध्ये बाद फेरीच्या लढतीत गोलंदाजी करणे, यातच सर्वकाही आले. स्टिव्हन स्मिथचा बळी आणि मधल्या षटकांत धावगतीवर लगाम घातल्यामुळे आॅस्ट्रेलियाला माफक धावसंख्येत रोखणे शक्य झाले. भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे. उपांत्य लढत मुंबईत होणार असून त्यात उर्वरित फलंदाजांकडून चमकदार खेळीची अपेक्षा आहे. आॅस्ट्रेलियाने मायदेशी परतल्यानंतर स्थानिक क्रिकेटमधून दोन दर्जेदार फिरकीपटूंचा शोध घेणे आवश्यक आहे. कारण उपखंडात चार वेगवान गोलंदाजांच्या जोरावर सामने जिंकणे शक्य नाही. दोन प्रतिस्पर्धी संघ वेगवेगळ्या पद्धतीने विचार करीत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. (गेमप्लान)