कोलकाता : भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. उभय देशांत लवकरात लवकर मालिका सुरू व्हावी, यावर त्यांनी भर दिला.शहरयार सध्या कोलकाता येथे आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही दोन्ही देशांनी सहा मालिका आयोजित करण्याचा करार केला होता. यातील पहिल्या मालिकेचे आयोजन डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआय कराराचे पालन करेल आणि मालिकेत सहभागी होईल, अशी आशा आहे. उभय देशांतील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाक क्रिकेट सामने पाहण्याची उत्कंठा आहे. खेळ आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी असल्याने दोहोंची सरमिसळ होऊ नये.’भारताला डिसेंबरमध्ये पाकविरुद्ध मालिका खेळायची असली, तरी दहशतवादामुळे मालिकेवर अनिश्चिततेचे संकट कायम आहे. उभय देशांत बोलचाल बंद असली, तरी क्रिकेटमध्ये राजकारण आणले जाऊ नये, असे शहरयार यांना वाटते. दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकला बसत असल्याने आम्ही कुठल्याही खेळाचे आयोजन करू शकत नाही. दहशतवाद आमच्यातर्फे पुरस्कृत नसून आम्ही नियंत्रित करण्याचाच प्रयत्न करीत आहोत हे भारताने समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.आयसीसीद्वारे होणाऱ्या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यासंदर्भात शहरयार यांना छेडताच कोलांटउडी घेत ते म्हणाले,‘मी असे कधीही बोललो नाही. खरेतर डिसेंबरमध्ये आयोजित मालिकेसाठी पीसीबी बीसीसीआयकडून येणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे.’ (वृत्तसंस्था)
क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये : शहरयार
By admin | Published: October 01, 2015 10:41 PM