नवी दिल्ली : नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या कसोटी मालिकेत दिमाखदार विजय मिळवलेल्या टीम इंडियाच्या अव्वल सहा खेळाडूंना दुखापतींना सामोरे जाण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, मालिकेतील अखेरच्या सामन्यात खुद्द कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यापुढची गोष्ट म्हणजे, या दुखापतग्रस्त खेळाडूंपैकी काहींना आगामी आयपीएलच्या काही सामन्यांना मुकावे लागेल. तर, काहीजण संपुर्ण स्पर्धेतच खेळणार नाही. मात्र, असे असले तरी घसघसीत कमाई होणाऱ्या स्पर्धेला मुकावे लागण्याची कोणतेही फार दु:ख या खेळाडूंना नसेल. कारण, स्पर्धेत न खेळताही या खेळाडूंना ठरलेले मानधन मिळणारच आहे. याला कारण म्हणजे, खेळाडूंचा काढण्यात आलेला ‘विमा’.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या करारबध्द राष्ट्रीय खेळाडूंचा खास आयपीएल स्पर्धेकरीता विशेष विमा काढलेला असून यानुसार एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल, तर त्याला पुरेपुर आर्थिक भरपाई त्या विम्याद्वारे दिला जातो. त्यामुळेच की काय, करोडो रुपयांची कमाई करुन देत असलेल्या आयपीएलमध्ये न खेळावे लागत असल्याची खंत अव्वल खेळाडूंना नसेल. बीसीसीआयकडून मिळालेल्या वृत्तनुसार कोहली, रविंद्र जडेजा आणि उमेश यादव ५ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १०व्या सत्रातील सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध असतील. तसेच, रविचंद्रन आश्विन, मुरली विजय व लोकेश राहुल मात्र पुर्ण आयपीएल खेळणार नाही.आयपीएलच्या चौथ्या सत्रादरम्यान तत्कालीन बीसीसीआय सचिव एन. श्रीनिवासन आणि राष्ट्रीय खेळाडूंसह या विशेष चर्चा झाल्यानंतर हा विमा लागू करण्यात आला. यानुसार एखाद्या वर्षी आयपीएलमध्ये दुखापत किंवा अपघात किंवा आजारपणामुळे न खेळल्यास खेळाडूंना विमा धोरणानुसार आर्थिक भरपाई मिळणार. देशाकडून खेळत असताना एखाद्या खेळाडूला दुखापत झाली आणि त्यामुळे तो खेळाडू आयपीएल खेळू शकला नाही किंवा काही सामने खेळू शकला नाही, तर तो खेळाडू या भरपाईसाठी पात्र ठरतो. त्याचबरोबर हा विमा बीसीसीआयशी करारबध्द नसलेल्या खेळाडूंना लागू होत नाही.बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना दुखापत झाल्यास आणि त्यामुळे आयपीएलला मुकण्याची शक्यता झाल्यास देखील खेळाडूला विम्यानुसार भरपाई मिळते. भारतीय संघाचे फिजिओ आणि बीसीसीआयची मेडिकल टीम खेळाडूंच्या दुखापतीची माहिती देते. संबधित आयपीएल फ्रँचाइजीचे फिजिओ आणि डॉक्टरही त्या खेळाडूची तपासणी करुन वैद्यकिय अहवाल तयार करतात. सर्व तपासण्या झाल्यानंतर जर खेळाडू आयपीएल रिपोर्टिग केल्यानंतर खेळण्याआधी संपुर्ण स्पर्धेला मुकला तर बीसीसीआय आणि संभधित फ्रँचाईजी समान भरपाई त्या खेळाडूला देतात.
न खेळताही उडणार मानधनाचे ‘विमा’न
By admin | Published: April 03, 2017 12:49 AM