- मयूर पठाडे/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - भारतीय क्रिकेटच्या विक्रमादित्य दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांनी वन डे क्रिकेटच्या इतिहासात 320 धावांची आजपर्यंतची सर्वोच्च भागिदारी करताना एक नवा इतिहास घडवला, पण हे करताना अनेक जुने विक्रमही मोडीत काढले. वनडे मधील महिलांचा विश्वविक्रम म्हणून प्रामुख्याने या विक्रमाकडे पाहिले जात असले तरी असा पराक्रम वन डेमध्ये अद्याप पुरुष क्रिकेटपटूही करू शकलेले नाहीत. 2006मध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपुल तरंगा यांनी वन डेमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च 286 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केलेली आहे.
आताच्या या खेळीमुळे दीप्ती आणि पूनम यांनी एकाचवेळी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पूनम राऊतने तर आणखी एक वेगळाच विक्रम केला आहे. वन डे, टेस्ट आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारात तिनं भारताकडून सर्वोच्च भागिदारी नोंदवलेली आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या चौरंगी वन डे क्रिकेट मालिकेत आयर्लंडविरुद्ध भारताच्या दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांनी तब्बल 320 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. कोणत्याही गड्यासाठीची ही आजपर्यंतची सर्वोच्च भागिदारी आहे. हा विक्रम रचताना दिप्तीने 188 तर पूनमने 109 धावा काढल्या.
या खेळीमुळे अख्ख्या जगाचं लक्ष या भारतीय विक्रमवीरांकडे गेलं असलं तरी एवढा मोठा विश्वविक्रम केल्यानंतरही या दोघींना आपण असा काही भीमपराक्रम केलाय, याची बराच वेळ माहितीही नव्हती. अगदी मॅच संपल्यानंतरदेखील त्यांना आपल्या या विक्रमाची काहीच कल्पना नव्हती. मॅचनंतर तब्बल दोन तासांनी त्यांना आपण असा काही पराक्रम केलाय याची कुणकुण लागली. तीही कशी? भारतीय महिला क्रिकेट टीमच्या व्हॅट्स अँप ग्रुपवर त्यांच्या अभिनंदनाचे आणि त्यांच्या विश्वविक्रमांचे संदेश यायला लागल्यावर त्यांना कळलं, की आपण काय करामत केलीय ते! खरं तर ही खेळी म्हणजे एक चमत्कारच होता, पण या खेळीनं अनेक नवे चमत्कारही घडवले.
कसा घडला हा चमत्कार? काय आहे या विश्वविक्रमाचं रहस्य?
दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघीही आपल्या या खेळीचं सारं र्शेय आपल्या प्रशिक्षकांना देतात. दिप्ती शर्माचे कोच आहेत विपिन अवस्थी तर पूनम राऊतचे प्रशिक्षक आहेत संजय गायतोंडे आणि चंद्रकांत राऊत.
बॉलरची भंबेरी उडवायची नवी रीत
प्रतिस्पर्धी बॉलरची लय बिघडवायची आणि त्याची भंबेरी उडवायची तर काय केलं पाहिजे? दीप्ती शर्मा आणि तिचे कोच विपिन अवस्थी यांनी त्यासाठी एक नवी स्ट्रॅटेजी ठरवली. गेले काही महिने दीप्ती शर्मा त्याचाच अभ्यास आणि कसून सराव करत होती. क्रिझच्या बाहेर येऊन बॉलरला बदडून काढायचं, चौकार आणि षटकारांची बौछार करायची अशी ही स्ट्रॅटेजी होती. ती यावेळी खूपच कामात आली. दीप्ती शर्मा सांगते, विक्रम, विश्वविक्रम करायचा असं काही डोक्यातही नव्हतं. फक्त लवकर विकेट टाकायची नाही, रनरेट कमी होऊ द्यायचा नाही, पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करताना अतिरेकी रिस्कही घ्यायची नाही, एवढंच मी ठरवलं होतं.
तिचं स्कोअरकार्डही तेच दाखवतं. दीप्तीनं पहिल्या 21 धावांसाठी 48 बॉल घेतले. 106 बॉलमध्ये 12 चौकारांसह तिनं सेंच्युरी ठोकली. नंतर मात्र तिनं जी काही दे-मार सुरू केली त्याला काही तोडच नाही. शेवटच्या 85 धावा तिनं काढल्या केवळ 34 बॉलमध्ये. त्यात 15 फोर आणि दोन उत्तुंग सिक्सर्सचा समावेश होता. दीप्ती शर्मा सांगते, लहानपणापासून सचिन हाच माझा आदर्श होता आणि त्याच्याकडे पाहातच मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे सचिन आणि सौरव गांगुली यांनी भारतातर्फे 250च्या आसपास सर्वोच्च ओपनिंग पार्टनरशिप केलेली आहे एवढंच मला फक्त माहीत होतं.
भारताची सर्वोच्च विक्रमवीर पूनम राऊत
पूनम राऊची कहाणी आणखीच वेगळी. खेळात सातत्य नसल्यानं आजवर अनेक वेळा भारतीय संघातून तिची गच्छंती झाली आहे. मात्र प्रत्येक वेळी तिनं जिद्दीनं संघात पुनरागमन केलेलं आहे. पूनमचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतातर्फे तिनं पार्टनरशिपचा विक्रम केलेला आहे. टेस्टमध्ये 275 धावांच्या पार्टनरशिपचा आणि टीट्वेंटीमध्ये 130 धावांच्या पार्टनरशिपचा विक्रम तिच्या नावे आहे.
या दोन्ही खेळींत तिची साथीदार होती, थिरुश कामिनी. यावेळी वन डेतही विक्रम करताना तिनं थेट विश्वविक्रमालाच गवसणी घातली. यावेळी तिची पार्टनर होती दीप्ती शर्मा. पूनम राऊत सांगते, आजवर मी बर्याच वेळा, भारतीय संघातून काढलं गेल्यावर पुनरागमन केलं आहे. त्या त्या प्रत्येक वेळी मी ना परिस्थितीला दोष दिला ना कोणाकडे बोट दाखवलं. त्या त्या प्रत्येक वेळी मी फक्त स्वत:कडे पाहिलं. आत्मपरिक्षण केलं. चुका सुधारल्या आणि पुन्हा संघात परतले!.