बासेटेरे : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आम्ही वर्चस्व गाजवू, असा आशावाद अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केला आहे. अश्विन म्हणाला,‘पहिल्या सराव सामन्यादरम्यान विंडीजच्या फलंदाजीचा मला वेध आला. गेल्या दोन वर्षांत या संघाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आहे. त्यांच्यावर दडपण आणून पहिल्या डावात आघाडी संपादन करणे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. विंडीजमधील मंद होत असलेल्या खळपट्ट्यांवर अचूक फिरकी मारा करणे सोपे नाही, पण आम्हाला यात यश येईल, हे निश्चित.’उकाडा आणि मंद खेळपट्ट्या या येथील मुख्य समस्या असल्याचे सांगून अश्विन पुढे म्हणाला,‘येथील हवामानाशी एकरूप होऊन अधिक काळ मारा करण्यास आम्हाला सज्ज व्हावेच लागेल. विंडीजकडे फलंदाजांची चांगली फळी आहे. शिवाय चेंडू आणि बॅटने योगदान देणारे अनेक अष्टपैलू संघात आहेत. विंडीजवर विजय मिळविण्यासाठी सुरुवातीला मिळालेल्या यशाचे विजयात रूपांतर करणे हे धेय्य आखावे लागेल. ‘संयम’ ही यशाची गुरुकिल्ली असेल. विकेट मंद असतील पण गोलंदाजांना बळी घेणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी संयमाने मारा करावा लागणार आहे.’ मागच्या सामन्यात अमित मिश्राने १५-१६ षटके गोलंदाजी केल्यानंतरच त्याला बळी घेणे शक्य झाले, याकडे अश्विनने लक्ष वेधले. आतापर्यंत ३२ कसोटीत सहा अर्धशतके ठोकणारा अश्विन फलंदाजी कोच संजय बांगरसोबत स्वत:च्या फलंदाजीवर मेहनत घेत आहे. अखेरच्या टप्प्यात धावा काढून संघाला मोठी धावसंख्या उभारून देणे आपले उद्दिष्ट असल्याचे अश्विनने स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)कुंबळेंच्या टीप्स मोलाच्याकोच अनिल कुंबळे हे गोलंदाजांच्या मनातले जाणतात. योग्यवेळी ते योग्य सल्ला देतात.चांगला मारा करीत असाल तरी विकेट मिळत नसेल तर ते खांद्यावर हात ठेवून पुढे कसा मारा करायचा याबद्दल मार्गदर्शन करतात. गोलंदाजाचे स्वत:चे मत ते जाणून घेतात आणि मित्रासारखे वागत असल्याने त्यांच्याकडून बरेच शिकायला मिळते,असे अश्विन म्हणाला.
विंडीजवर वर्चस्व गाजवू : अश्विन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 2:24 AM