नवी दिल्ली : ‘मिशन टोकियो’अंतर्गत भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूने स्वत:च्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आवर घालण्याचा संकल्प सोडला आहे. देशाला पदक मिळवून द्यायचे असेल, तर फिट राहायलाच हवे. ‘फिट असू तरच हिट होऊ’या कॅचलाईनसह २०२० च्या आॅलिम्पिक पदकासाठी कठोर मेहनत करण्याचे खेळाडूंनी ठरविलेले दिसते.
कुणी स्वत:च्या पसंतीचे ‘राजमा चावल’ सोडले, तर कुणी मसालेदार पदार्थ आवडत असूनही त्याकडे पाठ फिरविली. मिठाई आणि चॉकलेटकडे यापुढे पाहायचेही नाही, असा खेळाडूंनी मनोमन निश्चय केला. गेल्या दोन वर्षांपासून शानदार कामगिरी करीत असलेल्या महिला हॉकी संघाला नोव्हेंबरमध्ये आॅलिम्पिक पात्रता फेरीद्वारे २०२० टोकियो आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करायचे आहे. त्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही. कर्णधार राणी रामपाल हिचा तर आतापर्यंतचा हा सर्वात फिट भारतीय संघ असल्याचा दावा आहे. सर्वच खेळाडू सल्लागार वेन लोम्बार्ड यांच्या ‘डायट प्लान’चे कसून पालन करीत आहेत.
भारताचा महिला हॉकी संघ १९८० च्या मॉस्को आॅलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहिला होता. आॅलिम्पिकचे महिला हॉकीतील हे पदार्पण होते. ३६ वर्षांनंतर संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला, पण १२ व्या स्थानावर राहिला. राणी म्हणाली, ‘गेल्या चार वर्षांत बरेच चित्र पालटले. रिओत आम्हाला अनुभव नव्हता. आॅलिम्पिक कसे खेळायचे, हे आता कळाले. रिओपासून बोध घेत आम्ही दोन वर्षांत बरीच प्रगती साधली.’
महिला हॉकी संघ सर्वात फिटएफआयएच हॉकी सिरिज फायनल्स जिंकून स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली कर्णधार राणी म्हणाली, ‘माझ्या मते हा सर्वांत फिट हॉकी संघ आहे. प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली. डायट प्लानचा अवलंब करून केवळ आॅलिम्पिक खेळायचे नाही, तर पदकही जिंकायचे आहे. आम्ही कार्बोहायड्रेट्स, मसालेदार, तेलकट जेवण सोडूले. चॉकलेट, मिठाई याकडे पाहतदेखील नाही. जपानवरून परतल्यानंतर केवळ एक दिवस आईच्या हातचे राजमा चावल खाल्ले होते.’