लुसाने : रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोवा हिच्यावर डोपिंगप्रकरणी लागलेल्या दोन वर्षांच्या बंदीबाबत क्रीडा लवादाने निर्णय दोन महिने पुढे ढकलल्याने मारिया रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. टेनिसमधील दिग्गज असलेली २९ वर्षांची मारिया जानेवारीत आॅस्ट्रेलियन ओपनदरम्यान मेलडोनियम या प्रतिबंधित औषधसेवनात दोषी आढळली होती. त्यानंतर तिच्यावर दोन वर्षांचे निलंबन लावण्यात आले. शारापोवाने हा निर्णय ‘कठोर’असल्याचे म्हटले होते. बंदीचा निर्णय कायम राहिल्यास शारापोवाच्या करिअरवर प्रश्नचिन्ह लागू शकते. क्रीडा लवादाने सुनावणी सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकताना निवेदनात, मारिया शारापोवा आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यातील वादावर क्रीडा लवादाचा निर्णय १९ सप्टेंबरपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.सुरुवातीला हा निर्णय १८ जुलैपर्यंत येण्याची अपेक्षा होती. निर्णय मारियाच्या बाजूने आला असता तर तिला रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले असते. (वृत्तसंस्था)
डोपिंगचा निर्णय लांबला; शारापोवा आॅलिम्पिकबाहेरच
By admin | Published: July 12, 2016 3:22 AM