कोलकाता : अखेरच्या षटकात विजेतेपद निश्चित करण्यासाठी १९ धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकवर असलेल्या अष्टपैलू क्रेग ब्रेथवेटने बेन स्टोक्सला पहिल्या चार चेंडंूवर सलग चार षटकार ठोकले आणि सुरू झाला वेस्ट इंडीजचा अभूतपूर्व विश्वविजेतेपदाचा ‘कॅरेबियन’ जल्लोष. इंग्लंडला ४ विकेटने नमवून वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, यासह दोन वेळा टी-२० विश्वविजेतेपद पटकाविणारा पहिला संघ म्हणून विंडीजने इतिहास रचला. विंडीज १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने सुद्धा २०१६चा विश्वचषक जिंकला आहे.ईडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक सामन्याआधी याच मैदानावर विंडीजच्या महिलांनी आॅस्टे्रलियाचा पाडाव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. महिलांच्या या ऐतिहासिक कामगिरीपासून प्रेरित झालेल्या पुरुषांनीही आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना अखेरपर्यंत झुंज देत इंग्लंडला नमवण्यात यश मिळवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला ९ बाद १५५ असे मर्यादित धावांत रोखल्यानंतर विंडीजचे विजेतेपद निश्चित मानले जाते होते.मात्र, इंग्लंडने जबरदस्त मारा करताना जॉन्सन चार्ल्स आणि धोकादायक ख्रिस गेल यांना स्वस्तात बाद करून विंडीजला मोठा धक्का दिला. त्यात भर म्हणजे भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून देणारा लिंडल सिमन्सही शुन्यावर परतल्याने विंडीज हातातील विजेतेपद घालवणार, असेच चित्र निर्माण झाले. मात्र, मार्लन सॅम्युअल्सने अखेरपर्यंत टिकून राहताना ६६ चेंडंूत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८५ धावांची विजयी खेळी केली. अष्टपैलू ड्वेन ब्रावोनेही २७ चेंडंूत २५ धावा काढल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागिदारी करून संघाला सावरले. मात्र, ब्रावो बाद झाल्यानंतर पुन्हा विंडीजच्या धावांना ब्रेक लागला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ९ बाद १५५ धावा अशी मजल मारली. अत्यंत निराशाजनक सुरुवात झाल्यानंतर जो रुट आणि जोस बटलर यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने समाधानकारक मजल मारण्यात यश मिळवले. विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. सॅम्युअल बद्रीने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोकादायक जेसन रॉयचा त्रिफळा उडवला. >गेल पुन्हा ‘फेल’अंतिम सामन्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू धडाकेबाज ख्रिस गेल होता. मात्र, स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात झळकावलेल्या तुफानी शतकानंतर गेलला ५ हून अधिक धावा फटकावण्यात अपयश आले. या सामन्यातही तो केवळ ४ धावांवर बाद झाला आणि त्याची टोलेबाजी पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटचाहत्यांचा हिरमोड झाला.> अखेरच्या षटकांत बे्रथवेटचे सलग ४ षटकारअखेरच्या ३ षटकांत वेस्ट इंडिजला विजयासाठी ३८ धावांची गरज.ब्रेथवेट आणि सॅम्युअल्सने इंग्लंड गोलंदाजीची धुलाई करण्यास सुरुवात केली. अखेरच्या षटकात विंडीजला १९ धावांचे लक्ष्य मिळाले. या वेळी ब्रेथवेटने कोणताही अधिक विलंब न लावता स्टोक्स टाकत असलेल्या या षटकात पहिल्याच चार चेंडंूवर चार उत्तुंग षटकार ठोकून संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. ब्रेथवेटने केवळ १० चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने विजयी नाबाद ३४ धावा कुटल्या.> संक्षिप्त धावसंख्या :इंग्लंड : २० षटकांत ९ बाद १५५ धावा (जो रुट ५४, जोस बटलर ३६, डेव्हीड विले २१; कार्लोस ब्रेथवेट ३/२३, ड्वेन ब्रावो ३/३७, सॅम्युअल बद्री २/१६) पराभूत वि. वेस्ट इंडीज : १९.४ षटकांत ६ बाद १६१ धावा (मार्लन सॅम्युअल्स नाबाद ८५, कार्लोस ब्रेथवेट नाबाद ३४, ड्वेन ब्रावो २५; डेव्हीड विले ३/२०, जो रुट २/९)> मॅथ्यूज, टेलरची अर्धशतकी खेळीकोलकाता : कोणाच्याही ध्यानीमनी नसताना वेस्ट इंडीजच्या महिला संघाने ऐतिहासिक विजेतेपद पटकावून पहिल्यांदाचा टी-२० विश्वविजेतेपदावर कब्जा केला. अंतिम सामन्यात बलाढ्य आॅस्टे्रलियाचा ८ विकेटने धुव्वा उडवून विंडीज महिलांनी दणदणीत बाजी मारली. विशेष म्हणजे, जेतेपद पटकाविल्यानंतर विंडीजच्या पुरुष खेळाडूंनीही मैदानात धाव घेत महिला संघाचे जल्लोषात अभिनंदन केले. महिला संघाने जेतेपद पटकावल्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेल्या पुरुष संघाकडूनही विंडीज पाठीराख्यांना विश्वविजेतेपदाची अपेक्षा आहे. त्यामुळेच आता इंग्लंडला नमवून विंडीज संघ जेतेपदाचा डबल धमाका करणार का? याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.ईडन गार्डनवर झालेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून आॅस्टे्रलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारताना निर्धारित षटकांत ५ बाद १४८ धावांची मजल मारली. महिला क्रिकेटमध्ये आव्हानात्मक असलेल्या या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीज संघाचा कस लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हायली मॅथ्यूज आणि कर्णधार स्टेफनी टेलर यांनी शानदार अर्धशतकी खेळी करुन केवळ विजयाचा पाया रचला नाही, तर संघाला विश्वविजेतेपदाच्या मार्गावर आणले. मॅथ्यूज - टेलर यांनी १५.४ षटकांत १२० धावांची निर्णायक भागीदारी करून चित्र स्पष्ट केले. मॅथ्यूजला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, तर संघाला जेतेपद पटकावून देण्यात संपूर्ण स्पर्धेत निर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या कर्णधार टेलरला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. क्रिस्टन बिम्स हिने मॅथ्यूजला बाद करून ही जोडी फोडली खरी, मात्र तोपर्यंत आॅसीच्या हातातील विजेतेपद जवळजवळ निसटले होते. यानंतर टेलरही आपले अर्धशतक झळकावून बाद झाली. दोघींनी संघाचे जेतेपद निश्चित केल्यानंतर डिंड्रा डॉट्टीन (नाबाद १८) आणि ब्रिटनी कूपर (नाबाद ३) यांनी संयमी खेळी करून वेस्ट इंडीजला महिलांचे पहिले वहिले टी-२० विश्वचषक जिंकून दिले. मॅथ्यूजने ४५ चेंडंूत ६ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांचा विजयी तडाखा दिला, तर टेलरने ५७ चेंडंूत ६ चौकारांसह शानदार ५९ धावांची खेळी केली.तत्पूर्वी, अडखळत्या सुरुवातीनंतर एलिस विलानी (३७ चेंडंूत ५२ धावा), कर्णधार मेग लॅनिंग (४९ चेंडंूत ५२ धावा) आणि एलिस पेरी (२३ चेंडंूत २८ धावा) यांच्या जोरावर आॅस्टे्रलियाने आव्हानात्मक धावसंख्या गाठली. डॉट्टीनने २ बळी घेत चांगला मारा केला, तर मॅथ्यूजने गोलंदाजीतही चमक दाखवताना एक बळी घेतला. > संक्षिप्त धावफलक :आॅस्टे्रलिया : २० षटकांत ५ बाद १४८ धावा (एलिस विलानी ५२, मेग लॅनिंग ५२, एलिस पेरी २८; डिंड्रा डॉट्टीन २/३३) पराभूत वि. वेस्ट इंडीज : १९.३ षटकांत २ बाद १४९ धावा (हायली मॅथ्यूज ६६, स्टेफनी टेलर ५९; क्रिस्टन बिम्स १/२७, रेने फॅर्रेल १/३५)
‘कॅरेबियन’चा डबल धमाका
By admin | Published: April 04, 2016 2:29 AM