मुंबई : बलाढ्य व संभाव्य विजेत्या महाराष्ट्राच्या दोन्ही किशोर व किशोरी संघांनी आपापल्या गटात अपेक्षित विजय मिळवताना २७व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. किशोर संघाने ‘अ’ गटात गुजरातचा, तर किशोरी संघाने दिल्लीचा सहजरीत्या धुव्वा उडवला.भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघाने पहिल्याच दिवशी दमदार विजय मिळवताना इतर संघांना धोक्याच्या इशारा दिला. गुजरातला खो-खोचे धडे देताना महाराष्ट्राच्या किशोरांनी ११-६ असा एक डाव व ५ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच डावात ११-२ अशी एकतर्फी आघाडी घेत महाराष्ट्राने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. तर यानंतर गुजरातला स्थिरावण्यास एकही संधी न देता महाराष्ट्राने एक डाव राखून बाजी मारली. आदित्य गणपुले (४.१० मि. आणि ३ बळी) याने अष्टपैलू खेळ करीत निर्णायक कामगिरी केली. तर शुभम थोरात व प्रथमेश मोरे यांनी जबरदस्त संरक्षण करताना गुजरातच्या खेळाडूंना चांगलेच पळवले. चंदू चावरेने आक्रमणात चमक दाखवली.दुसरीकडे महाराष्ट्राच्या किशोरी संघानेदेखील एकतर्फी विजयी सलामी देताना दिल्लीला १७-२ असे एक डाव व तब्बल १५ गुणांनी लोळवले. पहिल्या डावातच महाराष्ट्राने भलीमोठी आघाडी घेत दिल्लीच्या आव्हानातली हवा काढली. (क्रीडा प्रतिनिधी)अश्विनी पारसे, हर्षदा करे यांचे मजबूत संरक्षण आणि दीक्षा सोनसूरकर, कृतिका मगदुम यांचे वेगवान आक्रमण यापुढे दिल्लीचा काहीच निभाव लागला नाही.
बलाढ्य महाराष्ट्राची ‘डबल’ सलामी
By admin | Published: June 10, 2016 3:39 AM