नवी दिल्ली : भारताचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूसुनील छेत्री पहिल्यांदा मोहन बागान संघासाठी चाचणी द्यायला गेला होता, त्यावेळी तत्कालीन प्रशिक्षक सुब्रत भट्टाचार्य यांनी छेत्रीबाबत, ‘हा सडपातळ शरीरयष्टीचा बुटका पोरगा खरोखर गोल नोंदवेल का,’ अशी शंका व्यक्त केली होती. आंतरराष्टÑीय पातळीवर भारतासाठी सर्वाधिक गोल नोंदविणारा छेत्री २००२ मध्ये १२ वीची परीक्षा दिल्यानंतर कोलकाताच्या ऐतिहासिक क्लबच्या चाचणीसाठी आला होता. व्यावसायिक खेळाडू या नात्याने बगानने त्याला तीन वर्षांसाठी करारबद्ध करताच खुद्द छेत्रीचा विश्वास बसला नव्हता.
भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘जवळपास १७ वर्षांआधी सकाळी मी बगानच्या मैदानावर चाचणीसाठी अनेक युवा खेळाडू उपस्थित होते. कमी वयाच्या खेळाडूंना क्लबशी जोडण्याचे आम्ही ठरवले होते. सुनीलला पहिल्याक्षणी त्याच्यात मला विशेष क्षमता जाणवली नव्हती. युवा खेळाडूंना न्याहाळतो तेव्हा कधी कधी एखादा खेळाडू नजरेत भरतो. तेव्हा असे काहीच घडले नाही. त्यातल्या त्यात दोन खेळाडूंवर माझी नजर स्थिरावली. ते खेळाडू म्हणजे छेत्री आणि सुब्रत पाल.’