FIH Hockey Men's Junior World Cup 2023 - भारताच्या युवा हॉकी संघाने आज ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत अविस्मरणीय विजयाची नोंद केली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतासमोर तगड्या नेदरलँड्सचे आव्हान होते आणि पहिल्या हाफमध्ये भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर पडला होता. इथून भारत पुनरागमन करणे अवघडच होते, परंतु या यंग ब्रिगेडने तो करिष्मा करून दाखवला. ५७व्या मिनिटाला उत्तम सिंगने गोल करून भारताला ४-३ असा विजय मिळवून देताना उपांत्य फेरीत प्रवेश पक्का करून दिला.
टीमो बोएर्स ( ५ मि.) व पेपिंज व्हॅन डेर हेडेन ( १६ मि.) यांनी भारतीय बचावफळी भेदून नेदरलँड्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या हाफमध्ये डच संघाने ती कायम राखली. पण, दुसऱ्या हाफमध्ये भारतीयांकडून आक्रमक खेळ झाला. आदित्य अर्जुन ललागे ३४व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला अराईजित सिंग हुडालने गोल करून भारताला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. नेदरलँड्सकडून ऑलिव्हर हॉर्टेनसूसने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून नेदरलँड्सला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमणाची धार अधिक तीव्र केली आणि ५२व्या मिनिटाला सौरभ खुश्वालाने बरोबरी मिळवून दिली. सामना आता पेनल्टी शूटआऊटमध्ये जातो असे वाटत असताना उत्तम सिंगने ५७व्या मिनिटाला गोल करून भारताचा ४-३ असा विजय पक्का केला. भारताचा बचावपटू रोहितने अखेरच्या क्वार्टरमध्ये सहा पेनल्टी कॉर्नर वाचवून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले गेले.