ऑनलाइन लोकमत
सेंट किटस, दि. १७ - भारत आणि वेस्ट इंडिज अध्यक्षीय संघामध्ये वॉर्नर पार्क स्टेडियमवर झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित अवस्थेत सुटला. वेस्ट इंडिजच्या सहाबाद २२३ धावा असताना दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. या कसोटीत भारताच्या दृष्टीने अनेक जमेच्या बाजू आहेत.
भारताकडे पहिल्या डावात १८४ धावांची आघाडी होती. कर्णधार विराट कोहली (५१), लोकेश राहुल (६४) आणि रविंद्रा जाडेजा (५६) या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ३५० धावांचा टप्पा ओलांडला. आर.अश्विनने प्रभावी फिरकी गोलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात मिळून एकूण सहा गडी बाद केले.
दुस-या डावात जे ब्लॅकवूडने फक्त (५१) अर्धशतक झळकवले. अश्विनने त्याला क्लीनबोल्ड केले. सराव सामन्यातील हा अनुभव २१ जुलैपासून अँटिग्वा येथे सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला उपयोगी पडणार आहे.