रोहित नाईक ल्ल मुंबईगुढीपाडव्यानंतरचा दुसराच दिवस... सगळीकडे एक दिवस आधीच नववर्षाचे जल्लोषात स्वागत झालेले. मात्र वसई-नायगावमध्ये नववर्षाचा दुसरा दिवसदेखील जल्लोषाचा राहिला; आणि यास निमित्त होते ते वर्ल्डकप स्पर्धेत यूएई संघाकडून चमकदार कामगिरी केलेल्या यष्टीरक्षक स्वप्निल पाटील याचे आगमन. वर्ल्डकपची तयारी आणि त्यानंतरचा आॅस्टे्रलिया दौरा आटपून स्वप्निल तब्बल ३ महिन्यांनंतर घरी परतला होता. या अनपेक्षित स्वागताने स्वप्निलदेखील भारावून गेला. वर्ल्डकपमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाला एकही विजय मिळवता आला नाही. मात्र स्वप्निलच्या खेळीवर लक्ष लागलेल्या वसईकरांनी त्याच्या प्रत्येक खेळीचा मनसोक्त आनंद घेतला. स्वप्निलने यानिमित्ताने संघाची कामगिरी, वर्ल्डकपचा अनुभव यावर ‘लोकमत’सोबत खास बातचीत केली.हा अनुभव खूप रोमांचक होता. बलाढ्य संघांविरुद्ध खेळण्याचा आनंद लुटला. वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे लहानपासून स्वप्न होते, ते यानिमित्ताने पूर्ण झाले, असे स्वप्निलने सांगतानाच आम्ही कधीही इतक्या उच्च दर्जाचे क्रिकेट खेळलो नव्हतो. या स्पर्धेमुळे यूएई क्रिकेटला खूप फायदा होणार असून, प्रत्येक खेळाडूला आपल्या मर्यादा कळाल्या आहेत आणि त्यानुसार संघ पुन्हा उभा राहील, असेही स्वप्निल म्हणाला.भारताविरुद्ध खेळताना नेमक्या काय भावना होत्या? यावर त्याने सांगितले की, निश्चितच तो सामना भावनिक होता. मात्र मी वेळीच स्वत:ला सावरले. या सामन्यात मोठी खेळी करण्याचे ठरवले होते. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. आर. अश्विनच्या क्लास गोलंदाजीवर मी बाद झालो. तो जबरदस्त गोलंदाज असून, त्याची गोलंदाजी आव्हानात्मक आहे. द. आफ्रिकेची गोलंदाजी खूप भेदक आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजीविरुद्ध अर्धशतक झळकावल्याचा आनंद आहे. डेल स्टेन अप्रतिमच आहे, परंतु त्याच्यापेक्षा मॉर्नी मॉर्केल जास्त भेदक वाटला, असेही स्वप्निल म्हणाला.दरम्यान, पुढील वर्ल्डकपमध्ये केवळ १० संघांना प्रवेश देण्याच्या आयसीसीच्या निर्णयाविषयी स्वप्निल म्हणाला, अशाने आयसीसीच्या सहयोगी देशांना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील हा विषय उचलून धरला असून, त्याच्या सांगण्याप्रमाणे निदान मुख्य संघांनी सहयोगी सदस्य असलेल्या देशांचा दौरा करावा. जेणेकरून तेथील क्रिकेटचा स्तर उंचावण्यास मदत होईल. मी जेव्हा कधी यूएईवरून भारतात येतो तेव्हा विमानतळावर मोजकेच नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित असायचे. या वेळी मात्र ही संख्या खूप मोठी होती. सर्वांना बघूनच माझा थकवा निघून गेला. शिवाय गाडीत बसल्यावरदेखील घरच्यांना खूप फोन येत होते, त्यामुळे गावामध्ये नक्की काहीतरी हालचाल सुरू असल्याची जाणीव झाली. गावात पोहोचल्यावर मोठा धक्काच बसला. माझ्या स्वागतासाठी हार-तुरे, बॅण्डबाजा अशी जय्यत तयारी होती. मी याची काहीच कल्पना केलेली नसल्याने खूपच भारावून गेलो.- स्वप्निल पाटील (यष्टीरक्षक, यूएई)