ओडेंसे (डेन्मार्क) : आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या ली जुईरुई हिने भारताच्या पी. व्ही. सिंधू हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना २१-१९, २१-१२ असा विजय मिळवताना ६ लाख ५0 हजार डॉलर बक्षीस रकमेची डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.जागतिक क्रमवारीतील १३ व्या मानांकित सिंधूने उपांत्य फेरीत वर्ल्ड चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्यावर सनसनाटी विजय नोंदवताना अंतिम फेरीत धडक मारली; परंतु ती आॅलिम्पिक चॅम्पियन जुईरुई हिचे आव्हान पेलू शकली नाही.सिंधूला पहिल्या गेममध्ये चांगली संधी होती; परंतु चीनच्या खेळाडूंनी निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण गुण नोंदवले. दुसऱ्या गेममध्ये जुईरुईच्या शानदार खेळासमोर सिंधूकडे उत्तर नव्हते. चीनच्या या चॅम्पियन खेळाडूने ४७ मिनिटांतच ही लढत जिंकली, तसेच सिंधूविरुद्ध आपल्या कारकीर्दीतील लढतीचे रेकॉर्ड ३-२ असे उंचावले. सिंधू आणि जुईरुई यांच्यात या वर्षी दोनदा लढती झाल्या होत्या. एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेत चीनच्या खेळाडूने सिंधूला पराभूत केले होते, तर आॅगस्टमध्ये सिंधूने जुईरुई हिला जागतिक उपउपांत्यपूर्व फेरीत नमवले होते.रविवारी झालेल्या अंतिम फेरीतील पहिला गेम खूपच संघर्षपूर्ण ठरला. एकवेळ सिंधूने १६-१0 अशी आघाडी मिळवली होती; परंतु त्याचा फायदा ती घेऊ शकली नाही. सिंधूने ८-१0 असे पिछाडीवर पडल्यानंतर सलग आठ गुण घेताना महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. तथापि, आॅलिम्पिक चॅम्पियन जुईरुईने मुसंडी मारत १७-१७ व १८-१८ अशी बरोबरी साधली व नंतर २0-१८ अशी आघाडी घेत हा गेम २१-१९ असा जिंकला. जुईरुईने ६-१ अशी आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. तिने तिची आघाडी लवकरच १३-४ अशी केली व नंतर सलग चार गुण घेताना हा गेम आणि सामना २१-१२ असा जिंकला. चीनच्या खेळाडूने या सामन्यात सुरेख सर्व्हिस आणि फटके खेळले. (वृत्तसंस्था)
सिंधूचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले
By admin | Published: October 18, 2015 11:16 PM