नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा- सहा बोटे असलेल्या पायाच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या ‘आदिदास’ या कंपनीने स्वप्नाला जोडे उपलब्ध करून दिले. दोन्ही पायाला सहा-सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. आदिदास कंपनीने स्वप्नाला जोड्याचा आकार घेण्यासाठी जर्मनीतील प्रयोगशाळेत नेले होते.
आपल्या नवीन जोड्या मिळाल्याचा आनंद व्यक्त करतांना स्वप्ना म्हणाली की “ मला मिळालेल्या या जोड्या पाहून मी उत्साही आहे. हे बूट घालून प्रशिक्षण घ्यायला या आधीच मी सुरूवात केली आहे. आणि मला हे कळते की मी आता दुखण्यावर लक्ष केंद्रित न करता खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. आता माझा प्रवास सुखकर होईल, मी आदिदासच्या भारतातील टीमची आभारी तर आहेच पण त्याचबरोबर ॲथलीट सर्व्हिसेस लॅब ने यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचीही आभारी आहे. मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते कीमाझ्या पायांकरता विशेष बूट तयार केले जातील. मी आता अधिक मेहनत करून देशासाठी अनेक पुरस्कार जिंकण्याचा प्रयत्न करीन.”
आदिदास ने एशियन गेम्स नंतर स्वप्ना बरोबर करार करून तिच्या प्रवासात सहकार्य करण्याचे ठरवले आणि ती जागतिक स्तरावर यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले. या आधीही आदिदास ॲथलीट सर्व्हिस लॅब ने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या बरोबर अशा प्रकारे करार करून दुखापती पासून मुक्ती मिळवण्यासाठी व त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत व्हावी यासाठी बूट तयार केले होते.स्वप्ना बरोबरच आदिदास ने नुकतीच धावपटू हिमा दास आणि निखट झरीन यांच्या सह काही खेळाडूं बरोबर करार करून भारतातील तरूण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला आहे.