मेलबर्न : मैदानावरील वाद थांबविणे आणि कसोटी सामन्यात डीआरएसचा वापर मर्यादित करण्याची मागणी आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी केली आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान चुरशीच्या मालिकेत उद््भवलेल्या तणावपूर्ण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भारताने कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला. या मालिकेदरम्यान मैदानावरील वक्तव्य अनावश्यक असल्याचे सांगत ‘चुकीचे वक्तव्य’ खेळाचा भाग असायला नको, असे त्यांनी म्हटले आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू आणि आॅस्ट्रेलियन मीडियाने त्यानंतर कोहलीला लक्ष्य करताना त्याची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत केली. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वादामध्ये उडी घेताना सीईओ जेम्स सदरलँड यांनी कोहलीला कदाचित ‘सॉरी’ हा शब्द कसा लिहिला जातो, याची माहिती नसल्याचे म्हटले होते. स्लेजिंगचे लोण धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटीपर्यंत कायम राहिले. त्यात रवींद्र जडेजा व मॅथ्यू वेड वाद घालीत असल्याचे दिसून आले तर स्मिथने मुरली विजयविरुद्ध अपशब्दाचा वापर केला. दरम्यान, चॅपेल यांनी डीआरएसचा वापर मर्यादित करण्याचा सल्ला दिला आहे. चॅपेल म्हणाले,‘यावर पूर्णपणे पंचाचे नियंत्रण असायला हवे. क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपला किंवा नाही, यासाठी डीआरएसचा वापर व्हायला नको. मुरली विजयने धरमशालामध्ये जोश हेजलवूडचा झेल टिपला. स्लिपचा कुठलाही समजदार क्षेत्ररक्षक तो झेल वैध आहे किंवा नाही, हे ठरवू शकला असता. क्षेत्ररक्षक मैदानाकडे बोटे ठेवून झेल टिपू शकत नाही. हा केवळ कॅमेऱ्याचा प्रभाव होता की एका रिप्लेमध्ये त्याच्या उलट भासत होते.’चॅपेल यांनी कोहली व स्मिथ यांच्या नेतृत्वशैलीवर कुठलेही वक्तव्य केले नाही, पण धरमशाला कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेची प्रशंसा केली.(वृत्तसंस्था) >स्लेजिंगला लगाम घालणे आवश्यकमैदानावरील चुकीच्या वक्तव्यांना लगाम लागायला पाहिजे. त्यामुळे फलंदाज मानसिक संतुलन गमावू शकतो. स्लेजिंगला लगाम घातला नाही तर टीव्हीवरील प्रेक्षकांसाठी ती चांगली स्थिती राहणार नाही. मालिकेमध्ये अनेकदा वाद झाले. दरम्यान स्लेजिंगही होत होती. या सर्वाची सुरुवात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ डीआरएसच्या निर्णयासाठी ड्रेसिंग रुमची मदत घेताना निदर्शनास आल्यानंतर झाली. त्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला जवळजवळ धोकेबाज असल्याचे म्हटले होते.
मैदानावरील वाद, डीआरएसचा वापर कमी करावा : चॅपेल
By admin | Published: April 03, 2017 12:39 AM