ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - तडकाफडकी निर्णय घेत एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने महेंद्रसिंग धोनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या दमदार खेळाच्या आधारावर क्रिकेटमध्ये वेगळी उंची गाठणारा महेंद्रसिंग धोनी अनेक ब्रॅण्ड्सचा आवडता खेळाडू होता. देशभरातील त्याची लोकप्रियता पाहता जाहिरात क्षेत्रातही त्याला चांगली मागणी होती. महेंद्रसिंग धोनी प्रत्येक जाहिरातीमागे 8 ते 12 कोटींच मानधन घेत होता.
धोनीची जाहिरीत क्षेत्रातून होणारी वार्षिक कमाई तब्बल 125 ते 150 कोटी इतकी आहे. मात्र आता कर्णधारपद सोडल्याने हा आकडा खाली येऊ शकतो. जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनीचे नाव होते. 2016 च्या यादीत धोनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू 2.1 कोटीवरुन 1.1 कोटी डॉलरवर घसरल्याचं नोंद करण्यात आलं होतं. दरम्यान रॅकिंगमध्येही घसरण होऊन 5 वरुन 10 वर पोहोचला होता. यानंतरही आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या यादीत टॉप 10 मध्ये धोनीचा समावेश होता.
'कर्णधारपद सोडल्याने महेंद्रसिंग धोनी आता फक्त एक स्टार खेळाडू असणार आहे. कर्णधारपद सोडल्याने ब्रॅण्ड व्हॅल्यूवर नक्कीच फरत पडतो. राहुल द्रविडच्या बाबतीत हे पाहिलं गेलं होतं', असं जाहिरात क्षेत्रातील संदिप गोयल यांनी सांगितलं आहे.
'कर्णधारपद सोडल्याने महेंद्रसिंग धोनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी होईल. मात्र हे लगेच होणार नाही. धोनीचे काही ब्रॅण्ड्ससोबत असलेले करार अजून एक दीड वर्ष तरी संपणार नाहीत. पण जेव्हा त्यांना रिन्यू करायची वेळ येईल तेव्हा ही व्हॅल्यू घसरेल', असं संदिप गोयल बोलले आहेत. 'जाहिरात क्षेत्रात अनेक प्रतिस्पर्धी असतात. याअगोदरही राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीसारख्या कर्णधारांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रॅण्ड व्हॅल्यू घसरल्याचं पाहिलं गेलं आहे', असंही संदिप गोयल सांगतात.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर मात्र यामध्ये अपवाद आहे. कर्णधार म्हणून अयशस्वी झाल्यानंतर त्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत काही फरक पडला नव्हता. महेंद्रसिंग धोनीला कूल कॅप्टन म्हणून ओळखले जायचे. पण राजीनामा दिल्याने त्याचा हा कूल स्टेटसही निघून गेला आहे. आता त्याच्या जागी विराट कोहली, रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते.