ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 13 - अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या पुनरागमनामुळे उत्साही गुजरात लायन्स आयपीएल-१० मध्ये शुक्रवारी रायजिंग पुणे सुरपरायंट्स विरुद्ध विजय मिळविण्यास सज्ज आहे. गुजरातला पहिल्या वर्षी तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदा त्यांची सुरुवात पुन्हा खराब झाली. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील या संघाला केकेआर आणि सनराइजर्स हैदराबादकडून पराभवाचे तोंड पहावे लागले. पण जडेजामुळे बळकटी मिळणार आहे. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलूू कामगिरी केली होती. या संघाचा दुसरा अष्टपैलू खेळाडू विंडीजचा ड्वेन ब्राव्हो याच्या खेळण्याविषयी शंका आहे. तथापि त्याने काल सराव केला होता. या संघाचा भक्कम आधार फलंदाजी आहे. ब्रँडन मॅक्यूलम, अॅरोन फिंच, जेसन राय, रैना आणि दिनेश कार्तिक पाठोपाठ जडेजाकडूनही धावांची अपेक्षा राहील. मॅक्यूलम आणि फिंच यांची बॅट अद्याप तळपलेली नाही. सलामीवीर जेसन राय यानेही चांगल्या सुरुवातीचा लाभ मोठ्या खेळीत केला नव्हता. रैना आणि कार्तिक यांनी मात्र मधल्या फळीची धुरा स्वत:कडे घेत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजी फळी अनुभवहीन वाटते. अनुभवी प्रवीण कुमारच्या सोबतीला बासिल थम्पी, लेगस्पिनर तेजस बारोका, डावखुरा शिविल कौशिक हे नवे चेहरे आहेत. जडेजा आणि मुनाफ यांच्या रूपात आक्रमण भक्कम होईल, अशी आशा आहे. पुणे संघाने मुंबईला नमवून शानदार सलामी दिल्यानंतर किंग्स पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभव पत्करला. पोटदुखीमुळे मागच्या सामन्यास मुकलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथ उद्या खेळणार आहे. स्मिथ, तिवारी आणि सर्वांत महागडा बेन स्टोक यांच्यात मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय ठरावा.पुण्याची गोलंदाजी लेग स्पिनर इम्रान ताहिर, याच्यावर विंसबून आहे. विजय मिळवायचा झाल्यास अशोक डिंडा, दीपक चाहर आणि स्टोक्स यांची त्याला साथ मिळायला हवी.(वृत्तसंस्था)