नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर्सला वेळेवर व्हिजा न मिळाल्यामुळे जर्मनीत होणाऱ्या केमिस्ट्री कप स्पर्धेत त्यांना सहभागी होता येणार नाही. दरम्यान, राष्ट्रीय महासंघाने लवकरच या बॉक्सर्सला अन्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्रदान करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अन्य स्पर्धेत सहभाग नोंदवीत जर्मनीत होणाऱ्या स्पर्धेची भरपाई करण्यात येईल, असेही महासंघाने स्पष्ट केले. दोन आशियाई युवा पदकविजेत्यांचा समावेश असलेला या नव्या १० सदस्याच्या संघाला रविवारी रात्री जर्मनीला रवाना व्हायचे होते. पण व्हिजा न मिळाल्यामुळे सर्व योजनेवर पाणी फेरल्या गेले. भारतीय बॉक्सिंग महासंघाचे (बीएफआय) अध्यक्ष अजय सिंग यांनी सांगितले की, ‘आम्हला व्हिजा मिळू शकला नाही. कारण शेनजेन व्हिजासाठी आपण असलेल्या विभागातच अर्ज करावा लागतो. आम्ही केंद्रीकृत प्रक्रियेचा अवलंब करीत होतो. ही प्रक्रिया दिल्लीमध्ये पूर्ण होत होती. पण यावेळी आम्हाला सांगण्यात आले की, बॉक्सर्स जेथे राहतो तेथील विभागीय केंद्रामार्फतच अर्ज पाठवायला हवे. या प्रक्रियेमध्ये बराच वेळ वाया गेला आणि आम्हाला वेळेवर व्हिजा मिळू शकला नाही. भविष्यात व्हिजा मिळण्याची प्रक्रिया १५ दिवसांपूर्वीच सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’सिंग पुढे म्हणाले, ‘ज्या बॉक्सर्सला आज परत पाठविण्यात आले त्यांना लवकरच अन्य एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल. आगामी १५ दिवसांमध्येच हे होईल. त्यांनी निराश होऊ नये. आगामी २० दिवसांमध्ये निमंत्रित स्पर्धेसाठी चर्चा सुरू आहे.’या संघात आशियाई युवा पदक विजेता अंकुश दहिया (६० किलो) आणि रेयाल पुरी (८१ किलो) यांचा समावेश होता. केमिस्ट्री कप स्पर्धा १३ ते १८ मार्च या कालावधीत आयोजित होत आहे. (वृत्तसंस्था)
व्हिजा न मिळाल्याने भारतीय बॉक्सर्स स्पर्धेला मुकले
By admin | Published: March 13, 2017 3:29 AM