नवी दिल्ली : ऐकण्यास अजब वाटत असले, तरी भारताच्या मैदानी स्पर्धेतील अनेक खेळाडूंना तोंड उघडे ठेवून हसताना छायाचित्र काढणे अडचणीचे ठरले आहे. कारण, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आयोजकांनी त्यांना मान्यता कार्ड नाकारले आहे.भारतीय आॅलिम्पिक महासंघाने १९ खेळाडू व २ अधिकाºयांना ताबडतोब निकष पूर्ण करणारे छायचित्र पाठविण्यास सांगितले असून, त्यामुळे मान्यता कार्ड तयार करण्याची प्रक्रिया नव्याने सुरू करता येईल. मान्यता कार्ड तयार करण्यासाठीचा निर्धारितकालावधी संपला आहे; पण चूक सुधारण्यासाठी आयोजक या प्रकरणात आणखी वेळ देतील, अशी आयओएला आशा आहे.मान्यता कार्ड मिळाले, याचा अर्थ या खेळाडूंची आशियाई स्पर्धेसाठी निवड होईलच, असे नाही. प्रक्रियेनुसार संभाव्य यादीत समावेश असलेल्या खेळाडूंचे मान्यता कार्ड तयार करण्यात येते. त्यानंतर ज्यांची निवड होते ते खेळाडू स्पर्धेत सहभागी होतात.या १९ खेळाडूंमध्ये सर्वांत प्रसिद्ध नाव आहे महिलांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेतील विद्यमान चॅम्पियन व रिओ आॅलिम्पियन निर्मला शेरोनचे. तिचे छायाचित्र नामंजूर करण्यात आले, कारण बॅकग्राऊंड पांढरे नाही.केरळचा ४०० मीटरचा धावपटू सचिन रोबीला नव्याने छायाचित्र पाठविण्यास सांगण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या छायाचित्रात दात दिसत आहेत. राजस्थानची हिना (१०० मीटर) आणि सयाली वाघमारे (४०० व ८०० मीटर) यांच्याबाबतही असेच घडले आहे.बंगालची हिमाश्री राय छायाचित्रात हसताना दिसत असल्यामुळे तिचे कार्ड तयार झाले नाही. आता तिला नव्याने छायचित्र पाठवावे लागेल. युवा खेळाडू संजीवनी बाबूराव जाधव व ८०० मीटरचा धावपटू सजीश जोसेफ यांनी प्रिंट केलेल्या छायाचित्राचे फोटो काढून पाठविले आहेत. खेळाडूंना आज रात्रीपर्यंत छायाचित्र पाठविण्यास सांगण्यात आले आहे. एएफआयने १५० पेक्षा अधिक खेळाडूंची नावे मान्यता कार्डासाठी पाठविली आहेत. (वृत्तसंस्था)एएफआयच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘आयओएने आम्हाला मान्यता कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली होती. ऐकण्यास अजब वाटत असले, तरी आयोजकांनी हसतानाचे किंवा दात दाखविणारे छायाचित्र नसावे, असे निर्देश दिले होते. त्याचसोबत छायाचित्राचे बॅकग्राऊंड पांढरे असायला हवे.’भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाºयाने सांगितले, की आशियाई स्पर्धेत मान्यता कार्ड तयार करण्यासाठी छायाचित्र व पासपोर्ट अपलोड करण्याबाबत कडवे नियम आहेत. अधिकाºयाने सांगितले, ‘मान्यता कार्डासाठी छायाचित्र पाठविताना काय खबरदारी घ्यायची, याची आम्ही खेळाडूंना सुरुवातीलाच माहिती दिली होती. ज्यांनी निर्देशांचे पालन केले नाही, ते खेळाडू अडचणीत आले आहेत. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वीही असेच घडले होते. काही खेळाडूंचे मान्यता कार्ड नामंजूर झाल्यानंतर आम्ही नव्याने छायाचित्र पाठविले होते. त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि मान्यता कार्ड तयार केले होते.’
हसऱ्या छायाचित्रामुळे १९ खेळाडू अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:23 AM