ऑनलाइन लोकमत
ग्रोस इसलेट, दि. 12 - भारत - वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी यजमानांनी विश्रांतीपर्यंत ८३ षटकात ३ बाद १९४ धावांची मजल मारली. भारताच्या ३५३ धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केल्यानंतर सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने (६४) संघाला दमदार मजल मारुन दिली.डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने ३५३ धावा उभारल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने १ बाद १०७ अशी भक्कम सुरुवात केली. मात्र, यानंतर पावसाने तुफानी खेळी केल्याने तिसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. यामुळे आता हा सामना अनिर्णितकडे झुकला आहे. चौथ्या दिवशी विंडिजने १ बाद १०७ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना सावध पवित्रा घेतला. ब्रेथवेट - ब्रावो ही जमलेली जोडी भारताला झुंजवणार असे दिसत असतानाच इशांत शर्माच्या आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न चुकल्याने ब्रावो रविंद्र जडेजाकडे झेल देऊन तंबूत परतला. ब्रावोने १०१ चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा काढल्या. त्याने ब्रेथवेटसह दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर लगेच स्थिरावलेल्या ब्रेथवेटला रविचंद्रन अश्विनने बाद करुन भारताला तिसरे यश मिळवून दिले. ब्रेथवेटने १६३ चेंडूत ६ चौकारांसह ६४ धावांची दमदार खेळी केली. यावेळी भारत आपली पकड मजबूत करणार अशी चिन्हे होती. मात्र अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (नाबाद ३९) आणि जेरमेन ब्लॅकवूड (नाबाद २०) यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची नाबाद भागीदारी करुन विश्रांतीपर्यंत भारताला यश मिळू दिले नाही. (वृत्तसंस्था)......................................संक्षिप्त धावफलक :भारत (पहिला डाव) : सर्वबाद ३५३ धावावेस्ट इंडिज (पहिला डाव) : ८३ षटकात ३ बाद १९४ धावा (क्रेग ब्रेथवेट ६४, मार्लोन सॅम्युअल्स खेळत आहे ३९, जेरमेन ब्लॅकवूड खेळत आहे २०; इशांत शर्मा १/४०, आर. अश्विन १/५१)