PM Narendra Modi Congratulates Javelin Thrower Neeraj Chopra: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण इतिहास रचणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदींनी नीरजला फोन करुन सुवर्ण पदकाची कमाई केल्याबद्दल अभिनंदन केलं.
भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र, नीरजने या दोन्ही खेळाडूंचं स्वप्न सत्यात उतरवलं. भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८नंतर (अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.
नीरजनं सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजशी फोनवरुन संवाद साधला. यात मोदींनी नीरजचं कौतुक तर केलंच पण त्याच्या ध्येयशील आणि आत्मविश्वासाची भरभरून प्रशंसा केली. 'नीरज जी आपने तो देश का दिल खूश कर दिया', असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरजचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. नीरज चोप्रा हा भारतीय सैन्यदलातील आर्मी मॅन आहे. त्यामुळे, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनीही ट्वटि करुन नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.