वैभववाडी: राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा वरवडे(कणकवली) येथील सेंट उर्सुलाचा विद्यार्थी दुर्वांक राजेंद्र पाताडे याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत अझरबैजान(युरोप) येथे होणा-या 'युराशिया किक बॉक्सिंग चँपियनशिप' स्पर्धेत दुर्वांक देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.पाटणा(बिहार) येथील पाटलीपुत्र स्पोर्टस् स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत 40 ते 45 वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या दुर्वांक पाताडेने रौप्यपदकांची कमाई केली. या चमकदार कामगिरीमुळे त्याचा अझरबैजान येथे होणा-या आंतरराष्ट्रीय 'युराशिया किक बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात दुर्वांकचा समावेश झाला आहे.दुर्वांक हा गणराज स्पोर्ट्स अॅकॅडमी, मुंबईचा प्रशिक्षणार्थी असून त्याला अॅकॅडमीचे सचिव अविनाश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या खेळाचे बाळकडू त्याला सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरमध्ये मिळाले होते. राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविल्याबद्दल महाराष्ट्र किक बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष सत्यविजय राऊत यांनी दुर्वांकचे अभिनंदन केले असून, सिंधुदुर्गासह राज्यातही त्याचे कौतुक होत आहे.
राष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये दुर्वांक पाताडेला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 8:13 PM