भारताची स्टार धावपटू हिमा दास ( Hima Das) ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिनं पहिल्याच स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्रा प्री २ च्या महिला गटात तिनं हे यश मिळवले. द्युती चंद ( Dutee Chand) हिनंही १०० मीट शर्यतीत ११.४४ सेकंदाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या अमोज जेकबनं पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत वर्चस्व राखले.
आसामच्या धावपटू हिमा दासनं २३.२१ सेकंदाची वेळ नोंदवली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ती बराच काळ ट्रॅकपासून दूर होती. हिमानं सुवर्णपदक जिंकले असले तरी तिला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची २२.८० सेकंदाची पात्रता वेळ गाठता आली नाही. २०१८च्या जागतिक कनिष्ठ ४०० मीटर शर्यतीत तीनं ५०.७९ सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर एप्रिल २०१९मध्ये तिला दुखापत झाली आणि तिनं फक्त १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. २०० मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरनं २४.९१ सेंकदाची वेळ नोंदवली.
महिलांच्या १०० मीटर शर्यतात द्युतीनं ११.४४ सेकंदाची वेळ नोंदवली. कर्नाटकच्या धनेश्वरी ए नं ११.८९ सेंकदाच्या वेळेसह दुसरे, तर महाराष्ट्राच्या डिंड्रा डुडली व्हाल्लाडॅरेसनं ११.९२ सेंकदाच्या वेळेस तिसरे स्थान पटकावलं. पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत अमोज जेकबनं ४६.०० सेकंदाची वेळ नोंदवली.