पुणे : क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे शुक्रवारी समर्थन केले. भारतीय क्रिकेटविश्वातील सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या ‘कॅप्टन कूल’ माहीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्योने नेहमीच्याच बेधडक पद्धतीने प्रश्नांचे बाऊन्सर परतवून लावले. भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत येत्या रविवारी पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर होत आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच लढत असेल. आपण कधीच ‘स्प्लिट कॅप्टन्सी’च्या बाजूने नव्हतो, असे नमूद करून धोनी म्हणाला, ‘‘माझ्या मते, सर्व प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. भारतातही अशी व्यवस्था चालत नाही. विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे द्यावे, यासाठी मी योग्य वेळेची प्रतीक्षा करीत होतो. ही योग्य वेळ आता आली असल्याचे मला वाटले आणि मी वन-डे आणि टष्ट्वेंंटी-२0च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.’’ (क्रीडा प्रतिनिधी)कर्णधारपदाच्या प्रवासाचा आनंद लुटलादीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर हे पद सोडताना तुला काय वाटते, या प्रश्नाच्या उत्तरात धोनी म्हणाला, ‘‘कर्णधारपदाच्या काळाकडे मी एक प्रवास म्हणून पाहतो. २००४मध्ये मी संघात आलो. २००७मध्ये माझ्याकडे सर्वप्रथम संघाची धुरा सोपविण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी बदलल्या. त्यानुसार माझी भूमिका बदलली. प्रथम कर्णधार झालो तेव्हा संघात अनेक सिनियर खेळाडू होते. त्यांच्या निवृत्तीनंतर पोकळी निर्माण होऊ नये, म्हणून आधीपासूनच मी नव्या दमाच्या खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न केले. सीनियर्स निवृत्त झाल्यावर ज्युनिअर्सनी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली. ते भारतीय क्रिकेटचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे, याचा आनंद वाटतो. कर्णधारपदाच्या कालखंडात अनेक उतार-चढाव आले; मात्र आयुष्यात मी कुठल्याच गोष्टीचा पश्चात्ताप करीत नाही. मी या प्रवासाचा आनंद लुटला.’’बीसीसीआयला आधीच कल्पना दिली होती...बीसीसीआयच्या दबावाखाली धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. हे वृत्त अप्रत्यक्षपणे फेटाळून लावताना तो म्हणाला, ‘‘बीसीसीआयला खूप आधी मी या निर्णयाबाबत कळविले होते. २०१४मध्ये आॅस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर मी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोडण्याचा विचार मनात घोळत होता. योग्यवेळी तो अमलात आणला.’’
प्रत्येक फॉरमॅटला वेगळा कर्णधार नको
By admin | Published: January 14, 2017 1:22 AM