नवी दिल्ली : देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे जिगरबाज खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुढील दोन वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी १७५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.देशपातळीवर ही शिष्यवृत्ती नव्या ‘खेलो इंडिया’चे वैशिष्ट्य असेल. त्यानुसार विविध क्रीडा प्रकारांतील एक हजार तरुण व प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना सलग आठ वर्षे प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. मुलांमधील क्रीडा कौशल्य लहान वयातच हेरून दीर्घकालीन प्रशिक्षणाने गुणवान खेळाडू घडविण्याची अशी योजना देशात प्रथमच राबविली जात आहे. यातून जागतिक स्पर्धांसाठी मातब्बर खेळाडूंची पळी उपलब्ध होऊ शकेल, अशी सरकारला खात्री आहे.देशभरातील निवडक २० विद्यापीठांना ‘क्रीडा नैपुण्याची केंद्रे’ (स्पोर्टिंग एक्क्सलन्स हब) म्हणून विकसित करण्याचाही या कार्यक्रमात समावेश आहे. त्यामुळे गुणवान खेळाडूंना त्यांच्या क्रीडाप्रकारातील निपुणता प्राप्त करत असतानाच जोडीला औपचारिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सुलभ होईल.या कार्यक्रमाद्वारे क्रीडा क्षेत्राच्या समग्र विकासाकडे लक्ष दिले जाईल. त्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करणे, प्रतिभावान खेळाडू हुडकून त्यांना प्रशिक्षण देणे, दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करणे व एकूणच खेळांची किफायतशीर अर्थव्यवस्था निर्माण करणे इत्यादींचा समावेश असेल. याच कार्यक्रमात १० ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘राष्ट्रीय तंदुरुस्ती मोहीम’ हाती घेतली जाईल. शरीराने धट्टीकट्टी व खेळांमध्ये रस घेणारी तरुण पिढी निर्माण करणे हा याचा हेतू आहे.कार्यक्रमाची इतर उद्दिष्टेलैंगिक व सामाजिक भेदाभेद न मानता समाजाच्या सर्व थरांना सामावून घेऊन खेळांव्दारे सामाजिक अभिसरण करणे.अशांत व मागासलेल्या भागांतील तरुणांना खेळांकडे आकर्षित करून त्यांना विघातक कारवायांपासून परावृत्त करणे.शाळा व कॉलेज पातळीपासूनच क्रीडास्पर्धांचा दर्जा उंचावणे.व्यक्ती, समाज व देशाच्या विकासाचे एक साधन म्हणून खेळांचा उपयोग करणे.
दरवर्षी एक हजार खेळाडूंना प्रत्येकी ५ लाखांची शिष्यवृत्ती, सुधारित ‘खेलो इंडिया’, २० विद्यापीठांना विशेष प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 3:53 AM