पालेमबांग : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी भारतीय नौकानयनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करीत सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने ६: १७: १३ अशी विजयी वेळ नोंदवून प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. भारतीय संघातील सेनेचे जवान दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओमप्रकाश आणि सुखमीतसिंग चौकडीने भारताला नौकानयनात पहिले सुवर्ण जिंकून दिले.
अत्यंत साधारण कुटुंबातील सेनेच्या या जवानांनी कधीही हार न मानण्याची झुंजारवृत्ती दाखवून विजय मिळविला. सकाळच्या सत्रात दुष्यंतने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. या प्रकारात कोरियाच्या खेळाडूला सुवर्ण तर हाँगकाँगच्या खेळाडूला रौप्यपदक मिळाले. पाठोपाठ रोहित कुमार झा आणि भगवानसिंग या जोडीने लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्य जिंकले.२०१३ च्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दुष्यंतचे प्रयत्न सर्वांच्या पसंतीस उतरले. अखेरच्या ५०० मिटरमध्ये तो थकला होता. रेस संपताच त्याला स्ट्रेचरवर न्यावे लागले. पदक समारंभात त्याला उभे राहणे कठीण झाले होते. तो म्हणाला, ‘आयुष्यातील अखेरची रेस समजून प्रयत्न केले. अधिक ताकदीमुळे सर्दी- खोकल्याची बाधा झाली. ब्रेडचे दोन स्लाईस व सफरचंदाव्यतिरिक्त काहीच न खाल्ल्याने पाण्याचे प्रमाणही कमी झाले.’ नौकानयनात देशाला पहिले आशियाई पदक २०१० च्या ग्वांग्झू स्पर्धेत बजरंगलाल जाखड यांनी मिळवून दिले होते.
भारतीय सेनेचे जवान स्वर्णसिंग, दत्तू भोकनळ, ओमप्रकाश, सुखमीत यांची सांघिक कमाल
नौकानयन स्पर्धेत भारतीयांच्या झुंजार वृत्तीला सर्वांनीच सलाम केला. महाराष्ट्राचा दत्तू भोकनळला एकेरीत पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यावेळी तो ताप आल्याने आजारी होता आणि याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर झाला. त्याच्यामुळेच त्याची प्रकृती ठीक नसल्याचे पाहून त्याला सांघिक प्रकारातून संघाबाहेर ठेवण्यात येणार होते. मात्र, नंतर संघव्यवस्थापनाने दत्तूवर विश्वास ठेवत त्याला संघात समाविष्ट केले.ही संधी दत्तूने सत्कारणी लावली आणि संघाला सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे लाइटवेट एकेरी गटात दुष्यंतची तब्येत खूपच खालावली होती. तो शर्यत पूर्ण करेल की नाही अशीही शंका होती. मात्र अशा परिस्थितीमध्येही त्याने भारतासाठी कांस्य पटकावले. अंतिम फेरी पार केल्यानंतर त्याला अतिरिक्त आॅक्सिजन देण्यात आले, तसेच त्याला स्ट्रेचरवरुन पुढील उपचारासाठी नेण्यात आले.