मुंबई : आक्रमक फलंदाज इशांक जग्गीच्या (९०) धमाकेदार खेळीच्या जोरावर पूर्व विभागाने बुधवारी दक्षिण विभागाला ६ विकेट्सने सहजपणे मात दिली. यासह पूर्व विभागाने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.पूर्व विभागापुढे १७९ धावांचे लक्ष्य होते. दुसऱ्या षटकात इशान किशन (७) बाद झाल्यानंतर जग्गीने सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याने सलग दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी केली. ५१ चेंडूत ११ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना जग्गीने दक्षिण विभागाची गोलंदाजी फोडून काढली. जग्गीने श्रीवत्स गोस्वामीसह (२५) दुसऱ्या विकेटसाठी ६८ आणि सौरभ तिवारीसह (३३) तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची शानदार भागीदारी केली. तसेच, पहिल्या डावात गोलंदाजीमध्ये चमक दाखवलेल्या कर्णधार मनोज तिवारीने १४ धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण विभागाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७८ धावांची आव्हानात्मक मजल मारली.मयांक अगरवालने ३६ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावा केल्या. तसेच, कर्णधार विनय कुमारनेही लक्षवेधी फटकेबाजी करताना ४७ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांचा तडाखा दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. मात्र, नंतर जग्गीच्या तडाख्यापुढे यांची खेळी अपयशी ठरली. तिवारीने उत्कृष्ट मारा करताना ३१ धावांत ३ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)
पूर्व विभागाने दिला दक्षिणेला धक्का
By admin | Published: February 16, 2017 12:09 AM