ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर त्याच्यावर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुवर्ण पदक जिंकल्यानंतरचा दिवस कसा होता याबाबत विचारलं असता नीरज चोप्रानं दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीर दुखत होतं, अशी प्रांजळ कबुली दिली आहे. नीरजनं दिलेल्या माहितीवरुनच त्यानं हे सुवर्ण पदक जिंकण्यासाठी घेतलेल्या कष्टाची प्रचिती येते.
केंद्र सरकारनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदक जिंकलेल्या खेळाडूंचं आणि इतर सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याच्याशी संवाद साधण्यात आला. त्यानं अंतिम फेरीच्या क्षणांना उजाळा दिला. फायनलमध्ये दुसऱ्या प्रयत्नांत भाला ८७.४८ मीटर अंतरावर फेकल्यानंतर आपण काहीतरी विशेष केलं आहे याची कल्पना नक्कीच आली होती, असं नीरजनं सांगितलं.
'मेडल खिशातच घेऊन फिरतोय'"भाला थ्रो केल्यानंतरच मला कल्पना आली होती की मी काहीतरी विशेष केलंय. मला वाटलं मी माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कारण माझा थ्रो उत्तम गेला होता. दुसऱ्या दिवशी माझं शरीर खूप दुखत होतं. त्यातूनच मला माझा कामगिरीची जाणीव झाली. शरीर दुखत होतं पण जिंकलेल्या मेडलनं कोणतंच दुखणं जाणवत नाहीय. हे मेडल संपूर्ण देशासाठीचं आहे", असं नीरज म्हणाला.