ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12- टीम इंडियाकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज ए.बी.डिव्हिलिअर्स भावूक झालेला पाहायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपल्याबाबत बोलताना ""मी एक चांगला कर्णधार आहे, आणि या संघाला मी पुढे घेवून जाऊ शकतो, 2019 चा वर्ल्कप मी या संघाला जिंकवून देऊ शकतो"" असं तो म्हणाला.
""भारतीय संघावर दबाव निर्माण करण्यामध्ये अपयश आलं, आम्ही सहज विकेट सोडल्या. चांगलं प्रदर्शन करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्ही कधीच अशी फलंदाजी करत नाही पण पहिल्या 15-20 षटकांमध्ये भारताने जो दबाव निर्माण केला त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे"", असं सामना संपल्यानंतर डिव्हिलिअर्स म्हणाला.
स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना : विराट
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेवरील आठ विकेटने मिळवलेल्या विजयानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना असल्याचे म्हटले आहे. बर्मिंगहॅम येथे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही अशा सामन्याची पुनरावृत्ती होईल अशी आशाही विराटने व्यक्त केली.
कोहली म्हणाला, ‘‘नाणेफेक जिंकणे चांगले राहिले. खेळपट्टी विशेष काही बदललेली नव्हती. फलंदाजीसाठी ती पोषक होती. आज आमचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले आणि त्यांना गोलंदाजांनीही पूर्ण साथ दिली. जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्हाला फायदा घ्यायला हवा. डिव्हिलियर्सला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरलो हे आमच्यासाठी चांगले होते. कारण तो तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो.’’
विराटने धवनचीदेखील प्रशंसा केली. कोहली म्हणाला, ‘‘कोणी तरी शेवटपर्यंत फलंदाजी करणे आवश्यक होते. शिखरने बेजोड फलंदाजी केली. आम्ही आतापर्यंत जितके सामने खेळले त्यातील हा शक्यतो सर्वोत्तम होता.’’
भारताचा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे बांगलादेशविरुद्ध होणार आहे आणि कोहलीने तेथील खेळपट्टी आवडत असल्याचे सांगितले; परंतु त्याचबरोबर अति आत्मविश्वास न बाळगण्याचा सल्लाही आपल्या खेळाडूंना त्याने दिला. तो म्हणाला, ‘‘आम्ही बर्मिंगहॅम येथे खेळलो आहोत आणि आम्हाला तेथील खेळपट्टी आवडते. ती आमच्या खेळाच्या अनुकूल आहे. आम्ही मागे वळून पाहत नाही. सुधारण्यासाठी नेहमीच वाव राहतो.’’
२८ धावांत २ बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. तो म्हणाला, ‘‘आमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण सामना होता. आम्ही शांतचित्त राहून आपल्या व्यूहरचनेची अंमलबजावणी करू इच्छित होतो. मला जी जबाबदारी दिली जाते त्यात मी आनंदित आहे. चेंडू जास्त स्विंग होत नव्हता, त्यामुळे आम्ही बेसिक्सवर कायम राहिलो आणि आम्ही योग्य दिशेने गोलंदाजी करताना त्यांना आक्रमक खेळू दिले नाही. ’’