ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गेल्या काही वर्षांपासून स्थानिक क्रिकेट खेळत असलेल्या हरभजन सिंगने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला अत्यंत भावनिक पत्र पाठवलं आहे. स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करावी अशा आशयाचं पत्र त्याने कुंबळेला पाठवलं आहे.
प्रशासकीय समितीसमोर क्रिकेटपटूंच्या मानधनाचा मुद्दा उचलावा असं त्याने या पत्रात म्हटलं आहे. 21 मे रोजी कुंबळे प्रशासकीय समितीची भेट घेणार आहे. यावेळी करारबद्ध खेळाडूंच्या मानधनाविषयी चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हरभजनने हे पत्र कुंबळेलं पाठवलं आहे.
प्रथम श्रेणी सामन्यात (रणजी किंवा दिलीप ट्रॉफी) स्थानिक क्रिकेटपटूंना दिड लाख रूपये मिळतात तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना एक मॅच खेळण्याचे 15 लाख रूपये मिळतात.
काय म्हटलंय हरभजनने पत्रात -
गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रणजी ट्रॉफी खेळत आहे. रणजी ट्रॉफीचं आयोजन जगातील सर्वात श्रीमंत मंडळ करतं. तुम्ही सर्व रणजीपटू आणि नव्या खेळाडूंचे रोलमॉडेल आहात. बोर्डाचे अधिकारी तसेच सचिन, राहुल आणि सेहवागसारख्या खेळाडूंसोबत मानधनामध्ये बदल करण्याबाबत तुम्ही चर्चा करावी. बदल आणण्यास मदत करायला मी तयार आहे. 2004पासून मानधनामध्ये कोणताच बदल झालेला नाही ही हैराण कऱणारी गोष्ट आहे. त्यावेळी 100 रूपयांची काय किंमत होती आणि आता काय आहे. जर तुमच्या नोकरीतून तुम्हाला वर्षाला किती पैसे मिळतात हे तुम्ही सांगू शकत नसाल तर आजच्या काळात तुम्ही स्वतःला व्यावसायीक कसं काय म्हणू शकतात. हे खेळाडू त्यांचं भविष्य ठरवू शकत नाही कारण एका वर्षासाठी आपल्याला 1 लाख रूपये मिळणार की 10 लाख याचीच त्यांना माहिती नाही. यामुळे त्या खेळाडूंच्या खासगी आयुष्यात अनेक समस्या उद्भवतात.