ऑनलाइन लोकमत
बर्मिंघम, दि. 10 - दोन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचे आयसीसी चँपियन्स ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आले आहे. शतकवीर बेन स्टोक्स आणि इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या झंझावाती भागीदारीच्या जोरावर आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 40 धावांनी मात केली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची तीन बाद 35 अशी अवस्था झालेली असताना स्टोक्स आणि मॉर्गन यांनी जबरदस्त फलंदाजी करून इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, मॉर्गन 87 धावांवर धावबाद झाला. मात्र स्टोक्सने आपले शतक पूर्ण करत बटलरच्या साथीने इंग्लंडला विजयासमीप नेले. इंग्लंडची 40.2 षटकात चार बाद 240 अशी परिस्थिती असताना पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसामुळे पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडचा 40 धावांनी विजय घोषित करण्यात आला.
तत्पूर्वी, "करो वा मरो" अशी स्थिती असलेल्या लढतीत आरोन फिंच व स्टीव्हन स्मिथ यांची अर्धशतके आणि अखेरच्या षटकांमध्ये ट्रेव्हिस हेडने फटकावलेल्या 71 धावा यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 278 धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर डेव्हिड वॉर्नरच्या (21) रूपात ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. पण फिंच (68) आणि स्मिथ (56) यांनी 96 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाची पायाभरणी केली.
मात्र, फिंच आणि स्मिथ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. पण ट्रेव्हिस हेडने (नाबाद 71) एक बाजू लावून धरत संघाला 50 षटकात 9 बाद 277 धावांपर्यंत मजल मारून दिली.इंग्लंडकडून मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी चार बळी टिपले.
दरम्यान, आयसीसी चँपियन्स ट्रॉफीत आता इंग्लंड आणि बांगलादेशचा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.