नवी दिल्ली : नेदरलॅण्डमध्ये सुरू असलेल्या रिको ओपन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि स्कॉट लिपस्की यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. तर द्विज शरण आणि पुरव राजा या जोडीला पहिली फेरीदेखील पार करता आली नव्हती. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत पेस हा अमेरिकेच्या स्कॉट लिपस्की याच्या साथीने उतरला होता. त्यांना दुसरे मानांकित रावेन क्लासेन आणि राजीव राम यांनी ६-४,६-४ असे पराभूत केले. तर फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या द्विज शरण आणि पुरव राजा यांना आंद्रे सा आणि मायकेल व्हीनस यांनी ६-३,६-४ अशी मात दिली. दरम्यान इटलीत सुरू असलेल्या चॅलेंजर स्पर्धेत पुरुष एकेरीत रामकुमार रामनाथन याने आॅस्ट्रियाच्या सेबेस्टिएन आफनेर याला ६-२,४-६, ७-६ असे पराभूत केले. त्याचा पुढचा सामना कजाकिस्तानच्या १२६ व्या रँकिंग असलेल्या मिखाइल कुकुश्किनसोबत होईल. लिस्बन ओपनमध्ये प्रग्नेश गुणेश्वरन याला पहिल्या फेरीत जोओ डोमिनिगुएस याने ७-५,६-४ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)
भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: June 16, 2017 4:01 AM