ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २१ - भारताच्या ३९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने दिवसअखेर ५३ षटकांत ३ गडी गमावून १४० धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताची २५३ धावांची आघाडी आहे.
श्रीकंलेकडून सध्या थिरिमने (२८) व मॅथ्यू (१९) खेळत आहेत. सिल्व्हा ५१ धावांवर झेल बाद झाला. सलमाची फलंदाज करूणारत्ने अवघी एक धाव काढून बाद झाल्यानंतर कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणार कुमार संगकारा मैदानावर आला. मात्र ३२ धावांवर खेळताना अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. भारतातर्फे अश्विन व यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.
तत्पूर्वी वृद्धीमान सहाच्या (५६) झुंजार अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या सामन्यात भारताचा पहिला डाव ३९३ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवसाचा खेळ ६ बाद ३१९ धावांवर संपल्यानंतर सामन्याच्या दुस-या दिवशी वृद्धीमान सहाने चांगली खेळी करत डावाला आकार दिला. त्याने शानदार खेळी करत ५६ धावा तडकावत कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक फटकावले आणि भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा सहज पार करून दिला. मात्र तो बाद झाल्यानंतर तळाचे इतर फलंदाजही पटापट तंबूत परतल्याने भारताची अवस्था सर्व गडी ३९३ धावा अशी झाली. श्रीलंकेतर्फे हेराथने ४ तर प्रसाद, मॅथ्यूज व चमिराने प्रत्येकी २ गडी बाद केले. ३९३ धावांचा पाठलाग करणा-या श्रीलंकेचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणून त्यांच्यावर दबाव आणण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न असेल.
कसोटीच्या पहिल्या दिवशी के. एल. राहुलचे शतक ( १०८) आणि कर्णधार विराट कोहली ( ७८) व रोहित शर्मा (७९) शानदार खेळीमुळे भारताने पहिल्या दिवसाचा डाव संपताना ६ बाद ३१९ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यामुले हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे.
भारत पहिला डाव : मुरली विजय (०), के. एल. राहुल (१०८), अजिंक्य रहाणे (४), विराट कोहली (७८), रोहित शर्मा ( ७९), स्टुअर्ट बिन्नी (१०), वृद्घिमान सहा (५६), आर. अश्विन (२), मिश्रा (२४), इशांत शर्मा (२) व उमेश यादव ( नाबाद २)