ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २४ - न्यूझीलंडला 262 धावात रोखल्यानंतर तिस-या दिवसाअखेर भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. भारताने एक विकेट गमावत 159 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे 215 धावांची आघाडी आहे. लोकेश राहुल 38 धावांवर बाद झाल्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पूजाराने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा संयमपणे सामना केला. मुरली विजय 64 धावांवर खेळत असून चेतेश्वर पुजारा 50 वर खेळत आहे. चेतेश्वर पुजाराची ही नववं अर्धशतक आहे.
पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी एक बाद १५२ अशा भक्कम स्थितीत असलेल्या न्यूझीलंडला शनिवारी तिस-या दिवशी मात्र तीच लय कायम राखता आली नाही. कालच्या धावसंख्येत एकूण ११० धावांची भर घातल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव २६२ धावात आटोपला. तिस-या दिवशी रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही. न्यूझीलंडचा निम्मा संघ २२० धावात तंबूत परतल्यानंतर शेवटचे पाच फलंदाज अवघ्या सात धावात तंबुत परतले.
लॅथम (५८) आणि विलियम्सन (७५) नंतर राँची (३८), सँटनर (३२) आणि वॅटलिंग (२१) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. जाडेजाने पाच विकेट घेऊन न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. त्याने अश्विनने चार गडी बाद करुन चांगली साथ दिली. उमेश यादवने शुक्रवारीच गुप्टीलचा (२१) अडसर दूर केला होता. भारताकडे आता चांगली सुरुवात करुन मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. भारताने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या होत्या.