दुबई : येथे सुरु असलेल्या दुबई वर्ल्ड सीरिज फायनल्सच्या उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी मिळालेली सुवर्णसंधी गमावून भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल स्पर्धेतून बाहेर पडली. पहिला गेम जिंकून आघाडी मिळविल्यानंतरही सायनाला चिनी तैपेईच्या तेई जू यिंगकडून पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांतही पराभूत झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.जगातील दुसऱ्या क्रमांकाची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पाचव्या क्रमांकावरील यिंगविरुध्द पहिला गेम २१-१६ असा आरामात जिंकला होता. परंतु पुढील दोन गेममध्ये १८-२१ आणि १४- २१ असा धक्कादायक पराभव तिला स्विकारावा लागला. यिंगने ५१ मिनिटात हा सामना जिंकून या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा भंग केले. सायनाच्या पराभवामुळे वर्ल्ड नंबर वन खेळाडू कॅरोलिना मारिनला आपला शेवटचा सामना हरल्यानंतरही सेमीफायनलमध्ये स्थान मिळाले. मारिनला जपानच्या नोजोमी ओकोहराने हरविले. ओकोहराने तिनही सामने जिंंकून अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे सायनाला हरविणारी यिंगही सेमीफायनलमध्ये पोहचू शकली नाही. तीन पैकी तिने एकच सामना जिंकला होता. मारिन आणि सायनाने तीन-तीन गेम जिंकले होते, परंतु सायनला पाच गेम गमावण्याचे नुकसान सहन करावे लागले. मारिनने चार गेम गमावले होते, त्यामुळे ती सेमीफायनलमध्ये पोहचली.तत्पूर्वी भारताचा अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांतला सलग तीन सामने हरल्यामुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. सायना आणि श्रीकांत गेल्यावर्षी या स्पर्धेच्या सेमीफायलनमध्ये पोहचले होते. परंतु यावेळी ते साखळी फेरीतच गारद झाले. श्रीकांतला चीनी तैपेईचा खेळाडू चोउ तिएन चेन याने केवळ ३२ मिनिटात २१-१७, २१-१३ असे हरविले.(वृत्तसंस्था)
भारताचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: December 12, 2015 12:13 AM