टोकियो : विश्व क्रमवारीत अव्वल असलेली स्टार सायना नेहवाल ही जपान ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी जपानची मिनात्सू मितानीचे आव्हान परतविण्यात अपयशी ठरताच तिला स्पर्धेबाहेर पडावे लागले. पुरुष गटात कश्यपने सहकारी किदाम्बी श्रीकांतला धक्का देत स्पर्धेबाहेर ढकलले.स्पर्धेत दुसरी मानांकित असलेल्या सायनाला स्थानिक खेळाडू मितानीने ४० मिनिटांत सलग गेममध्ये २१-१३, २१-१६ ने नमविले. याआधी मितानीने पीव्ही सिंधूचा पराभव केला होता. सायनाने पहिल्या फेरीत थायलंडची बुसानन हिला नमवीत दुसरी फेरी गाठली होती. पण आॅलिम्पिक कांस्यविजेती सायनाला लय कायम राखता आली नाही. सायना आणि मितानी याआधी सात वेळा परस्परांपुढे आल्या होत्या. सायनाने पाच वेळा जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला नमविले होते. पण आज सायनाला १८ व्या स्थानावरील मितानीने धक्का दिला. सायना, प्रणव आणि श्रीकांत हे दुसऱ्या फेरीत, ज्वाला-अश्विनी, पी.व्ही. सिंधू, अजय जयराम, प्रज्ञा गद्रे, एन. सिक्की रेड्डी हे पहिल्या फेरीत तसेच आनंद पवार आणि तरुण कोना हे पात्रता फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाले. (वृत्तसंस्था)पुरुष एकेरीत राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णविजेता पारुपल्ली कश्यप याने तिसरा मानांकित के. श्रीकांतचा ४५ मिनिटांत २१-११, २१-१९ ने पराभव केला. यंदा सय्यद मोदी स्पर्धेदरम्यानदेखील कश्यपने विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला नमविले होते. जपान ओपनमध्ये आव्हान कायम राखणारा कश्यप एकमेव भारतीय खेळाडू आहे. एच. एस. प्रणय हादेखील स्पर्धेबाहेर झाला. दुसऱ्या फेरीत त्याला कोरियाचा ली डोंग कियून याने ४३ मिनिटांत २१-९, २१-१६ ने पराभूत केले.
सायनाचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: September 11, 2015 4:25 AM