हर्षा भोगले लिहितो...
इतक्या वर्षांच्या निरीक्षणानंतर मी हे सांगू शकतो की इंग्लंड संघाने काही नवे मार्ग शोधले आहेत. वन-डेत इंग्लंड संघ भक्कम आहे; पण भारत त्यांच्यापेक्षा वरचढ आहे. याआधीच्या तुलनेत सध्याचा इंग्लंड संघ सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. त्यांचे खेळाडू जुन्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक स्थिरावलेले वाटतात. वन-डे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांत दमदार ठरतील असेच खेळाडू पाहुण्या संघाने निवडले आहेत. २०१५च्या विश्वचषकात मी इंग्लिश खेळाडूंना पाहिले त्यावेळी असे वाटले की हे खेळाडू आधुनिक क्रिकेटच्या महामार्गावर जणू काही रिक्षा चालवीत आहेत. पण, त्या त्रासातही त्यांनी चांगले बीजारोपण केल्यामुळेच आजचा त्यांचा संघ अत्याधुनिक वाटत आहे. विविध खेळपट्ट्यांवर विविध वातावरणात इंग्लंडला येथे तगड्या भारताचे आव्हान लीलया पेलण्याची किमया साधावी लागणार आहे.इंग्लंड संघ वन-डे आणि टी-२० प्रकारात अशा संघाविरुद्ध खेळेल की ज्यांच्या डीएनएमध्येच मर्यादित षटकांचे क्रिकेट सामावले आहे. ज्या संघाकडे विराट आणि धोनी हे सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. हे दोघेही गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकारात प्रभावी जाणवले. पण, ५० षटकांच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दोघांच्याची कर्तृत्वाची पातळी एकसारखीच दिसते. माझ्या मते युवराजसिंग याच्या कामगिरीकडेदेखील अनेकांची नजर असेल. त्यामागे विविध कारणे आहेत. पण, माझी नजर मात्र महेंद्रसिंग धोनीवरच असेल. धोनीला कुठल्या स्थानावर खेळवावे यावरून काही वेळेसाठी मोठी चर्चा किंवा वादविवाद होऊ शकतो. पण, सर्वोत्तम फिनिशर असलेल्या धोनीला चौथ्या स्थानावर खेळविण्याची शिफारस अनेकजण करतील, अशी स्थिती आहे. धोनी जलद धाव घेण्यात तरबेज आहे. अझहरुद्दीन असाच खेळायचा. धोनी उत्कृष्ट फिनिशर असल्याने या मालिकेत तो हीच भूमिका वठवीत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. तो चौथ्या स्थानावर खेळायला आल्यास आणखी काही शतके देखील झळकवू शकतो. (पीएमजी/ईएसपी)