लीड्स : ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली आणि मॅथ्यू वेड यांच्या आक्रमक खेळीने आॅस्ट्रेलियाने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी उभारलेले ३०० धावांचे तगडे लक्ष्य इंग्लंडने तिथे ठरविले. इयोन मोर्गनची ९२ धावांची आश्वासक खेळी व त्याला बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली यांनी दिलेल्या सुरेख साथीने इंग्लंडने ३ गडी व १० चेंडू राखून ३०४ धावा टोलवून विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे. हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ बाद २९९ धावा केल्या. विजयासाठी ३०० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य घेऊन उतरलेल्या इंग्लंडला दुसऱ्याच षटकांत अॅलेक्स हेल्स (०) याच्या रूपाने झटका बसला. त्यामुळे १ बाद १ अशी स्थिती झाली. मात्र, सलामीवीर जॅसन रॉय (३६) व मोर्गन (९२) यांनी डाव सावरून दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. मोर्गनने ९२ चेंडंूत ८ चौकार व २ षटकारांच्या साह्याने खेळी साजरी केली. टेलर ८९ धावांवर बाद झाला. मात्र, मधली फळी व तळाच्या फलंदाजांनी आपली भूमिका पार पाडून विजयात वाटा उचलला. स्टोक्स (४१), बेअरस्टो (३१), मोईन अली (नाबाद २१), लियाम प्लंकेट (१७) व डेव्हीड विली (नाबाद १२) यांनी मोक्याच्या क्षणी धावा केल्या.तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने अवघ्या ६४ चेंडूंतच १० चौकार आणि २ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २९९, ग्लेन मॅक्सवेल ८५, बेली ७५, वॅडे नाबाद ५०, जॉन हास्टिंग नाबाद ३४, डेव्हिड विली ३/५१, मोईन अली २/४०, प्लंकेट २/४७ पराभूत.वि इंग्लंड : ४८.२ षटकांत ७ बाद ३०४, जॅसन रॉय ३६, जेम्स टेलर ४१, इयोन मोर्गन ९२, बेन स्टोक्स ४१, जॉनी बेअरस्टो ३१, मोईन अली नाबाद २१, डेव्हिड विली नाबाद १२.
इंग्लंडची आॅस्ट्रेलियावर मात
By admin | Published: September 12, 2015 3:23 AM